वाई मतदार संघातील सहा शाळा इमारतीसाठी चार कोटींचा निधी मंजूर

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शिक्षण सुविधा मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत वाई मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ६ शाळा खोल्यांना ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले.
वाई : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित शिक्षण सुविधा मिळवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत वाई मतदारसंघातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ६ शाळा खोल्यांना ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात भक्कम व पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सातत्याने प्राधान्य दिले असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
मंत्री मकरंद पाटील पुढे म्हणाले की, शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठीच्या या सकारात्मक निर्णयामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता आधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहेत. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीतील जिल्हा परिषदेच्या तीन खोल्यांसाठी ४५.७५ लाख, शिरवळ येथील दोन खोल्यांसाठी ३०.५०, खंडाळ्या येथील ७ खोल्यांसाठी एक कोटी ६ लाख ७५ हजार, वाई तालुक्यातील बोपर्डी जिल्हा परिषद शाळेच्या पाच खोल्यासाठी ७६ लाख २५ हजार, महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड जिल्हा परिषद शाळेच्या तीन खोल्यांसाठी ९१ लाख ५० हजार व राजपुरी जिल्हा परिषद शाळेच्या सहा खोल्यांसाठी ९१ लाख ५० हजार रुपये निधी निधी मंजूर झाला असुन त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च दर्जाचे शिक्षण घेत असताना त्यांना भक्कम आणि सुरक्षित पायाभूत सुविधा लाभाव्यात, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासाचे दार खुले करण्यासाठी हा निर्णय मोलाचा ठरणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांचेही याकामी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे त्यांनी सांगितले. शाळा विकास व व्यवस्थापन समित्या, ग्रामस्थ आणि पालक वर्गाकडून या निर्णयाचे स्वागत होत असून ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना मिळणार असल्याचा विश्वास निर्माण होण्यास मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.