मुसळधार पावसामुळे ढेबेवाडी खोऱ्यात नऊ घरांची हानी

पावसामुळे परिसरातील विविध गावांतील आणखी नऊ घरांची पडझड झाल्याने महिनाभरात घरांच्या पडझडीचा आकडा ४० वर पोहोचला आहे.
ढेबेवाडी : पावसामुळे परिसरातील विविध गावांतील आणखी नऊ घरांची पडझड झाल्याने महिनाभरात घरांच्या पडझडीचा आकडा ४० वर पोहोचला आहे. महसूल यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत असले, तरी जुन्या घरांच्या पडझडीचा आकडा वाढत चालल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबांत भीतीचे वातावरण आहे.
गेल्या महिनाभरात ढेबेवाडी, कुठरे मंडलातील वाझोली, कसणी, भरेवाडी, तेटमेवाडी, लोटळेवाडी, जोशीवाडी, महिंद, पाळशी, मंद्रुळकोळे खुर्द, बनपुरी, असवलेवाडी आणि तळमावले मंडलातील मानेगाव, कुंभारगाव, शेंडेवाडी, खळे, काढणे, बागलवाडी, शिद्रुकवाडी आदी गावांतील ३१ घरांची पडझड झाली होती.
आणखी नऊ घरांच्या भिंतीची पडझड झाल्याचे आज महसूल विभागाकडून सांगण्यात आले. सणबूर येथील दोन, जिंतीतील तीन, मोडकवाडीतील एक, लोटळेवाडीतील एक, गुढ्यातील एक आणि धामणीतील एका घराची पडझड झाल्याचे सांगण्यात आले.
मंडल अधिकारी नागेश निकम, मृदुला कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी विशाल पाटील, अक्षय लोहार, बाळासाहेब गायकवाड, स्नेहल थोरात, पल्लवी बोंडे आदींनी नुकसानीचा पंचनामा केला.