भाजपचे आरोप मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच : इंद्रजीत चव्हाण

माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत.
कराड : माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत. भाजपचे आरोप हे मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच केले आहेत, अशी टीका इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी गजानन आवळकर, अजितराव पाटील, भानुदास माळी, झाकीर पठाण, दिग्विजय सूर्यवंशी, प्रशांत देशमुख, बंडानाना जगताप, नितीन थोरात, नानासो पाटील, शिवाजीराव मोहिते, प्रदीप जाधव आदींची उपस्थिती होती.
यापुढे बोलताना इंद्रजित चव्हाण म्हणाले, दुबार मतदान नोंद आणि बोगस मतदान यामध्ये फरक आहे. माझे व माझ्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे असलेल्या दुबार मत नोंदणीबाबत आम्ही ज्या त्या वेळी निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील नाव कमी करून एकाच ठिकाणी नाव असण्याबाबत अर्ज केले होते. परंतु असे असताना आमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत असणे हि निवडणूक आयोगाचीच चूक आहे, असे आमचे स्पष्ट आरोप आहेत.
मुळात मतदार यादीमध्येच घोळ आहे व ती निर्दोष झाली पाहिजे यासाठीच तर आमची मागणी आहे. परंतु निवडणूक आयोगावर आरोप केले तर त्यांच्या मदतीसाठी भाजपचे पदाधिकारी धावून येतात. यावरूनच निवडणुकीत नक्की काय प्रकार झाला हे दिसून येते. माझे सध्याचे असलेले वय व मतदार यादीतील असलेले वय यामध्ये तफावत आहे. जर नाव नोंदणी नजीकची आहे तर ती सिद्ध करावी आणि जर दुबार मतनोंदणी प्रमाणे दुबार मतदान केले आहे तर ते पुराव्यासहित सिद्ध करावे, अशी आमची मागणी आहे.
यावेळी गजानन आवळकर म्हणाले, माझे मार्गदर्शक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचा गेली ४० वर्षे मी स्वीय सहायक म्हणून काम करीत आहे. माझ्यावर झालेले आरोप निरर्थक आहेत. कारण, माझे मूळ गाव वाठार असून मी राहायला कराड मध्ये आहे. दोन्ही ठिकाणी मतदान नोंदीबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी इनकॅमेरा सुनावणी झाली होती. त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात वाठार मध्येच मतदान नोंद ठेवण्याबाबत अर्ज केला होता. पण अजूनही आमची नावे दोन्ही मतदार यादीत आहेत. कागदोपत्री सर्व पुरावे असताना सुद्धा माझे नाव जर दोन ठिकाणी असेल तर यामध्ये पूर्णपणे निवडणूक आयोगाची चुकी आहे. यामुळे माझ्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचे मी खंडन करतो.