घरफोडीतील 5 लाखाचा ऐवज जप्त

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यवसायिकाच्या घरातून रोकड व सोन्याचा ऐवज लंपास करणार्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून रोकड व सोन्याचा ऐवज असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल व्यवसायिकाच्या घरातून रोकड व सोन्याचा ऐवज लंपास करणार्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी संशयिताकडून रोकड व सोन्याचा ऐवज असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
विशाल अजित आटोळे (वय 26, रा. गोगावलेवाडी, ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि.4 ऑगस्ट रोजी राजन हिरकचंद मामणिया (वय 57, न्यू राधिका रोड, सातारा) यांच्या बंद घरातून चोरट्याने चोरी केली होती. शाहूपुरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस तपास करत होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पोलिसांनी घटनास्थळावर जावून तक्रारदार यांच्याकडून चोरीची माहिती घेतली. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील सुमारे 20 ते 25 सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी करुन चोरट्यांचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आटोळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व 1,94,500 रुपये रोख रक्कम असा 4,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कुमार ढेरे व पोलीस सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.