साताऱ्यात मतचोरीबद्दल काँग्रेस महिला पदाधिकारी आक्रमक

राहुल गांधी यांनी वोट चोरी उघड केली असून, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेल्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्ती अभियानाच्या वतीने साताऱ्यात सह्यांची मोहीम राबविली.
सातारा : राहुल गांधी यांनी वोट चोरी उघड केली असून, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी केलेल्या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शक्ती अभियानाच्या वतीने साताऱ्यात सह्यांची मोहीम राबविली. या उपक्रमात सातारा शहर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
राहुल गांधींनी नुकताच वोट चोरचा मुद्दा हाती घेतला असून, भाजपकडून लोकशाहीची झालेली पायमल्ली संपूर्ण देशासमोर आणली आहे. त्याला प्रतिसाद देत आज महिलांनी साताऱ्यात एकत्र येऊन लोकशाही वाचविण्यासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. पोवई नाका येथे दुपारी झालेल्या या आंदोलनात महिलांनी स्वाक्षरी करून राहुल गांधींना पाठिंबा दर्शविला.
या प्रसंगी कार्यकर्त्यांनी महिलांना एकत्र येऊन न्याय, सत्य व संविधान रक्षणासाठी लढा देण्याचे आवाहन केले. या आंदोलनात सुषमा राजे घोरपडे, प्राची ताकतोडे, अनिता जाधव, अनिता भोसले, शोभा गोळे, धनश्री मालुसरे, हजारा शिकलगार, वैशाली कदम, अर्चना पाटील, शारदा कांबळे, पवित्रा पवार, शीतल कदम, मेघा बेंद्रे सहभागी झाल्या होत्या.