सातारा जिल्हा बँक राज्यात आघाडीवर

स्वयंरोजगार निर्मिती अनदान कर्ज योजनेमध्ये सातारा जिल्हा बँक राज्यात आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करताना सातारा जिल्हा बँकेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते बँकेस प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
सातारा : स्वयंरोजगार निर्मिती अनदान कर्ज योजनेमध्ये सातारा जिल्हा बँक राज्यात आघाडीवर आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये शासन पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करताना सातारा जिल्हा बँकेने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते बँकेस प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर सौरभ सिंग, नाबार्ड साताराच्या उपमहाव्यवस्थापक दीपाली काटकर, लीड बँक मॅनेजर नितीन तळपे, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक विजय कोरडे, जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक दंडगव्हाळ उपस्थित होते. शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात राष्ट्रीयकृत व इतर खासगी बँकेपेक्षा सातारा जिल्हा बँकेचा सिंहाचा वाटा आहे. यामुळे जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेस खर्या अर्थाने चालना मिळाली आहे. देशामध्ये सातारा जिल्हा बँकेची गौरवशाली परंपरा असून बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे.
बँकेस सन 2025-26 या वार्षिक पतपुरवठा आराखड्यामध्ये खरीपाचे 1300 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. सातारा जिल्हा बँकेने रुपये 1400 कोटींचे वितरण करुन कर्जाचे 11 टक्के उद्दिष्ट पूर्तत: केली आहे. तसेच जिल्ह्याच्या एकूण उद्दिष्ट पूर्ततेमध्ये जिल्हा बँकेने 55 ते 60 टक्के इतके वाटप करून सिंहाचा वाटा उचलला आहे.
शासन पुरस्कृत योजनांमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज अनुदान योजनेमधून बँकेने 3500 उद्योजकांना रक्कम रुपये 350 कोटींहून अधिक कर्ज पुरवठा करून शासनाच्या व्याज अनुदान योजनेचा लाभ प्राप्त करून दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हा बँकेने 546 व्यावसायिकांना रक्कम रुपये 50 कोटी एवढे अर्थसहाय्य मंजूर केले असून जवळपास 200 सभासदांना रक्कम रुपये 10 कोटी इतके अनुदान प्राप्त करुन दिले आहे. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा बँक पीक कर्ज पुरवठ्याबरोबरच मध्यम मुदत दीर्घ मुदत शेती व शेतीपूरक कर्ज प्राधान्यक्रम क्षेत्रातील कर्जे तसेच बिगर शेती कर्ज पुरवठ्यामध्ये प्रभावी कामगिरी करत असून जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यात बँकेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हा पुरस्कार बँकेच्यावतीने सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी स्वीकारला. बँकेला मिळालेल्या पुरस्काराबद्दल बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. मकरंद पाटील, संचालक खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.