बाप्पांच्या आगमन सोहळ्यांनी साताऱ्यात गणेशोत्सवाची चाहूल

सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी श्री गणरायाचे आगमन होत असून, आगमन सोहळ्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी श्री गणरायाचे आगमन होत असून, आगमन सोहळ्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्याला उत्सवाचे स्वरूप आले आहे. जिल्ह्यात रिमझिम त्या पावसामध्ये गणराया आगमनाच्या खरेदीसाठी बाजारपेठा वसंतून राहिल्या, सातारा शहरांमध्ये मंगळवारी सातारा शहरातील विविध मंडळाचे आगमन सोहळे रंगले. मंगळवारी हरतालिका पूजा होत असून सुवासिनींनी पूजा साहित्यासाठी बाजारपेठेमध्ये गर्दी केली होती.
सातारा जिल्ह्यामध्ये 542 गावांमधून एक गाव एक गणपती साजरा होत आहे, तसेच जिल्ह्यात सात हजार गणेशोत्सव मंडळांच्या गणरायाची प्रतिष्ठापना होत आहे. बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनासाठी आकर्षक मखरे, झुंबर, विद्युत माळा, पर्यावरण पूरक सजावटीचे साहित्य इत्यादी खरेदीसाठी गणेश भक्तांनी साताऱ्यात गर्दी केली होती. बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनासाठी मिठाई बाजारातही मोठी उलाढाल झाली. आंबा मोदक, खवा मोदक उकडीचे मोदक, विविध स्वरूपाचे मोदक उपलब्ध होते. उकडीच्या मोदकांना प्रत्येक नगाला 25 रुपये दर आकारला जात होता. गणरायाच्या पूजनासाठी नारळाची प्रचंड टंचाई जाणवली, त्यामुळे पूजनासाठी असणार नारळाची किंमत 80 रुपये पर्यंत पोहोचली होती. कुंभारवाड्यातून सातारा शहरात मांडवांमध्ये श्रीमूर्ती वाजत गाजत नेण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. शहरांमध्ये सोमवारी 34 गणेशोत्सव मंडळांचे आगमन सोहळे रंगले. कुंभारवाडा ते चांदणी चौक, राजवाडा मोती चौक ते राजपथ तसेच राधिका रोड या मार्गावरूनही सातारा शहराच्या उपनगरांमध्ये जाणारी गणपती वाजत गाजत मांडवात नेण्यात येत होते. राजपथाने दुपारी चार वाजल्यानंतर प्रचंड गर्दी अनुभवली. सातारा शहर पोलिसांनी अडीचशे कार्यकर्त्यांसह शहरातून संचलन केले. पोलीस मुख्यालय, मोती चौक गोलबाग येथून मोती चौक, 501 पाठी मार्गे पोवई नाका ते पोलीस परेड ग्राउंड असे संचलन करण्यात आले, या संचलनाची स्वतः पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पाहणी केली.