माण-खटावच्या राजकारणात नवा अध्याय : अनिलभाऊ देसाईंचा राष्ट्रवादीत दमदार प्रवेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रशासकीय पकड, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आक्रमक नेतृत्व, आणि अनिलभाऊ देसाई यांचे समाजाशी नाते, सहकारातील अनुभव या तिघांच्या एकत्रीकरणामुळे माण-खटाव तालुक्याच्या विकासगंगेला नवा वेग मिळणार आहे. हा फक्त पक्षप्रवेश नाही, तर ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठीचा ऐतिहासिक क्षण आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रशासकीय पकड, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे आक्रमक नेतृत्व, आणि अनिलभाऊ देसाई यांचे समाजाशी नाते, सहकारातील अनुभव या तिघांच्या एकत्रीकरणामुळे माण-खटाव तालुक्याच्या विकासगंगेला नवा वेग मिळणार आहे. हा फक्त पक्षप्रवेश नाही, तर ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठीचा ऐतिहासिक क्षण आहे.
राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात, पण लोकांच्या मनात स्थान मिळवणारे नेते हेच खरे नेतृत्व असते. ना. अजितदादा, ना. मकरंदआबा, खा. नितीनकाका आणि अनिलभाऊ हे त्याच नेतृत्वाचे प्रतीक आहेत. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात या संगमामुळे नवा अध्याय सुरू झाला आहे.
माण-खटाव तालुक्याच्या राजकीय पटावर मोठी घडामोड घडली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष, माण-खटावचा आक्रमक चेहरा आणि तालुक्याच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व अनिलभाऊ देसाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रविवारी, दि. 24 रोजी दहिवडी बाजार पटांगण येथे जाहीर प्रवेश होत आहे. या प्रवेश सोहळ्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आबा, राज्यसभा खासदार नितीन काका पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. ही फक्त पक्षांतरणाची घटना नाही, तर माण-खटावच्या राजकारणात बदल घडवणारा टर्निंग पॉईंट मानला जात आहे. कारण अनिलभाऊ देसाई हे नाव म्हणजे आक्रमक नेतृत्व, संघर्षशील वृत्ती आणि विकासासाठी झटणारी प्रतिमा.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेताना अनिलभाऊंच्या मागे असलेली प्रेरणा म्हणजे राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व. अजितदादा हे बोलण्याप्रमाणे कृती करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कारकीर्दीत घेतलेले निर्णय, जलद कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांशी असलेली थेट नाळ हे त्यांचे वैशिष्ट्य. वित्त, नियोजन, सिंचन अशा महत्त्वाच्या खात्यांचा कारभार जबाबदारीने सांभाळणारे अजितदादा हे स्थैर्य, विकास आणि कार्यकुशलतेचे प्रतीक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी विकासाच्या नव्या दृष्टीकोनाने काम करत आहे. सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहती, रोजगार निर्मिती, तरुणांना संधी, स्थिर सरकार हा अजेंडा घेऊन ते पुढे सरसावत आहेत. त्यामुळेच माण-खटावमधील अनिलभाऊंसारखे नेते या प्रवाहात सामील होणे, हे राजकीय समीकरण बदलणारे ठरणार आहे.
या प्रवेश सोहळ्याची खासियत म्हणजे मंत्री मकरंद पाटील यांची उपस्थिती. जिल्ह्याच्या राजकारणात धडाकेबाज शैली, स्पष्ट बोलणे आणि कार्यकर्त्यांचा आधारस्तंभ म्हणून मकरंदआबा ओळखले जातात. आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात कुणी चुकीचे बोलले, तर तितक्याच कडक शब्दांत उत्तर देण्याची त्यांची पद्धत आहे. मंत्रीपद सांभाळताना देखील ते कार्यकर्त्यांच्या छोट्या-छोट्या अडचणींसाठी नेहमी उपलब्ध राहतात. थेट संवाद, त्वरित कृती, जनतेशी असलेला विश्वास आणि संकटात उभे राहण्याची तयारी यामुळे मकरंद आबांचे नाव आज जिल्ह्यात प्रभावी नेतृत्व म्हणून घेतले जाते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि खासदार नितीनकाका पाटील यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवचैतन्य देण्यासाठी मोठा धडाकेबाज उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून प्रभावी नेतृत्व पक्षात आणत, संघटनेची पकड अधिक मजबूत करण्याचे कार्य ते करत आहेत. अलीकडेच कराड दक्षिणचे नेते ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यानंतर आता माण-खटावमधील दमदार नेतृत्व असलेले नेते अनिलभाऊ देसाई हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली येणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे माण-खटाव तालुक्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला निर्माण करण्याचा चंग बांधण्यात आला आहे. नितीनकाका पाटील यांच्या कुशल नियोजनामुळे आणि प्रभावी संपर्कामुळे जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
अनिलभाऊंचा प्रवास हा खऱ्या अर्थाने सामान्य कार्यकर्त्यापासून सर्वसामान्यांचा नेता होण्यापर्यंतचा 28 वर्षांचा संघर्षाचा प्रवास आहे. 2007 ते 2012 कालावधीत पंचायत समिती सदस्य, तसेच 2012 साली गोंदावले जिल्हा परिषद गटातून मोठ्या मतांनी निवडून येण्याचा विक्रम केला आहे. सलग 24 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक आणि दोन वेळा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळून त्यांनी सहकार क्षेत्रात भक्कम पाय रोवला. पण त्यांची खरी ओळख घडली ती माण तालुक्याच्या दुष्काळाशी लढताना. एकेकाळी पाण्यासाठी वणवण करणारा माण तालुका पाण्याच्या टंचाईतून मुक्त करणे हे त्यांचे स्वप्न होते. 2003 पासून सलग 15 वर्षे टेंभू योजनेसाठी आंदोलन, मोर्चे, ठिय्या आंदोलन करत त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी राजकारण नव्हे तर समाजकारण हाच मार्ग निवडला.
दहिवडी तहसील कार्यालयासमोर 16 गावांसह 16 दिवस ठिय्या आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, पुणे व मुंबई येथे ठिय्या आंदोलन अशा अखंड लढ्यामुळेच टेंभू योजनेचे पाणी अखेर माणमध्ये पोहोचले. जे पंधरा वर्षात झाले नाही ते अनिलभाऊंनी दोन वर्षांत करून दाखवले. त्यामुळे आज ते ‘पाणीदार नेतृत्व' म्हणून ओळखले जातात. सहकार हा ग्रामीण भागाचा कणा आहे, हे ओळखून अनिलभाऊंनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक बळ दिले. सलग चारवेळा संचालकपदी निवडून येणे आणि दोन वेळा उपाध्यक्षपद मिळवणे हे त्यांच्या कामगिरीचे प्रमाण आहे. कोविड काळातही अनिलभाऊंनी म्हसवड कोविड केंद्राला मदत, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वैद्यकीय यंत्रसामुग्री उपलब्ध करून देणे आणि जनतेला मानसिक आधार देणे अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. त्यामुळे जनतेशी असलेले नाते आणखी घट्ट झाले. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, शेतीपुरक उद्योग, गरिब गरजूंसाठी मदत या उपक्रमांतून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
आज अनिलभाऊंच्या प्रवेशामुळे माण-खटाव तालुक्यातील राजकीय गणित बदलणार हे निश्चित. कारण ते केवळ लोकप्रिय नाहीत तर संघर्ष करणारे, जनतेच्या हितासाठी आवाज उठवणारे, तडजोड न करणारे नेतृत्व आहेत. त्यांच्या पाठिशी आहे अजित पवारांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मकरंद पाटील आबांची धडाकेबाज शैली. त्यामुळे हा संगम माण-खटावसाठी विकासाची नवी दारे उघडेल, असा जनतेचा विश्वास आहे. माण-खटावचा हा नवा प्रवास म्हणजे केवळ पक्षबदल नाही, तर स्थैर्य, विकास आणि लोकाभिमुख राजकारणाची नवी सुरुवात. अनिलभाऊ देसाई यांचा संघर्ष, सहकाराची ताकद आणि समाजासाठीची निष्ठा यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकांचे हक्काचे नेते ठरले आहेत.
- आण्णासाहेब मगर