कोरेगाव विधानसभा मतदार संघातील 98 टक्के गावे ओलिताखाली येणार : महेश शिंदे
दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरलेल्या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या विस्तारिकरणाच्या कामास मंजूरी मिळाली असून कामाच्या निविदा आज प्रसिद्ध झालेल्या आहेत.
सातारा : दुष्काळी जनतेसाठी वरदान ठरलेल्या लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या विस्तारिकरणाच्या कामास मंजूरी मिळाली असून कामाच्या निविदा आज प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामुळे कोरेगाव, खटाव आणि सातारा या तीन तालुक्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघातील 98 टक्के गावे ओलिताखाली येणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार महेश शिंदे यांनी दिली.
दरम्यान, ज्यांनी लोकसभेला आणि विधानसभेला महायुतीच्या विरोधात काम केले त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समितीला तिकीट देण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती यावेळी त्यांनी केली.
शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मी आभार मानतो. आज लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जी कोरेगाव मतदार संघाची अर्थवाहिनी, जलाहिनी राहिली आहे, त्याच्या विस्तारिकरणाचे काम मी स्वत: कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना सुरुवात केली होती. कोरेगाव मतदार संघाला ज्यादाचे दोन टीएमसी पाणी मंजूर करुन घेतले. त्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जो अतिरिक्त निधी होहता तो आज आम्हाला मिळाला आहे. त्याच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. एका महिन्यात हे काम सुरु करतोय. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जिहे कटापुरच्या माध्यमातून सुरुवातीला खटाव तालुक्यासाठी होती. खटाव तालुक्यात शेतीचे सिंचन होणार होते. त्याचे विस्तारिकरण कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीपासून भाडळे, अपशिंगे, अंभेरीपर्यंत एल थ्री आणि एल फोर टप्यात होणार आहे. ही योजना कोरेगाव तालुक्यातील जिहे कटापुर मधून तासगाव उपसा सिंचन योजना मुळ स्वरुपात आणली गेली आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील देगाव, वर्णे, निगडी, अंगापुर तर्फ तारगाव, धनगरवाडी, कोडोली, वाजेगाव ही गावे पाण्यापासून वंचित होती. त्या गावांना तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी उपलब्ध करुन दिले. त्याचीही निविदा प्रसिद्ध झाली. त्याचेही काम पुढच्या महिन्यात सुरु होतेय. महाराष्ट्रातला पहिला कोरेगाव मतदार संघ असेल की मतदार संघातील 98 टक्के क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. नेर तलावातून एल 1 आणि ए ल 2 सेक्शनचे काम पुर्ण झाले आहे. दोन वर्षाचा कालावधी असताना सव्वा वर्षात पूर्ण केले. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना हा सर्व्हे केला होता. आता एल 1 एल 2चा टप्पा पूर्ण झाला. खटाव तालुक्यात एल 4चे काम जांब, जाखणगाव, मोळ, मांजरवाडी, दरजाई या गावांना जाणाऱ्या योजनेच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. एल 1 पासून एल 2 पूर्ण झाल्या. कार्यान्वित झाल्या. त्यामुळे निढळला, शेंदेवाडीला पाणी पोहचले. एल 3 पासून एल 7 पर्यंत हे पाणी पोहचते आहे. कोरेगाव तालुक्यातून भाडळे खोऱ्यापासून देऊर, बिचुकले ही गावेही पाण्याखली येत आहेत. आज निविदा प्रसिद्ध झाल्यात त्याचा मला मनस्वी आनंद होतो आहे.
खटाव, कोरेगाव मतदार संघाचा पाण्याचा संघर्ष साधारण 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्र खटाव, कोरेगाव, सातारा तालुक्यात ओलिताखाली येते आहे. याच्यातून पुढचा टप्पा होत आहे. पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कच्या माध्यमातू पाणी पोहचवण्यात येणार आहे. 15 एकराला एक टी हा महाराष्ट्रातला पहिला प्रयोग मी राबवला आहे. 98 टक्के गावे सिंचनाखाली येणार आहेत. जी गावे नदी आणि कॅनॉलचे इरिकेशन सोडून आहेत. त्यांना ओलिताखाली आणण्यात येणार आहे. तसेच जे पाणी वाहून जाणार आहे. ते अडवणार आहे. तसेच काहींना 127 कोटी मिळाले आहेत, तर काहींना 103 कोटीं, जसे टप्पे आहेत तसा निधी असून असे सगळे टप्पे मिळून 1800 कोटी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरेगाव शहरात पाण्याचे संकट टळणार
कोरेगाव शहराची पाणी टंचाई टाळण्यासाठी मी स्वत:ची तीन गुंठे जागा कोरेगाव नगरपंचायतीला दान केली आहे. ती बंधाऱ्यातील जागा स्वत: विकत घेतली होती. कोरेगावच्या पाण्यासाठी 67 कोटीची योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर करुन दिली. विहिर काढायचे काम सुरु आहे. पंपाचे काम सुरु आहे. 24 बाय सात योजना सुरु करतो आहे. 80 टक्के काम पुर्ण झाले. त्यामुळे कोरेगावचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्यांनी उदयनराजेंच्या विरोधात काम केले त्यांना तिकीट नाही
आम्ही महायुतीमधून लढण्याचा निर्णय घेतला आणि वरीष्ठ सांगतील तशी चिन्हे उमेदवारांना दिली जातील, तिकडे साताऱ्यात महाराजांशी ट्युनिंग चांगले आहे. खाली जयाभाऊंशी ट्युनिंग चांगले आहे. आम्ही एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. ज्या लोकांनी प्रामाणिक दोन्ही निवडणूकीला काम केले. त्यांना उमेदवारी द्यावी असा आग्रह आहे, असे सांगत आमदार महेश शिंदे म्हणाले, महायुतीची राज्याची समन्वयाची बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई ही उपस्थित होते. त्या ठिकाणचे निर्णय हे आमदार त्यांच्या स्थरावर घेतील, आमचीही बैठक झाली. ज्यांना योग्य वाटेल तो निर्णय घेतील, ज्याला एकट्याला लढायचे ते एकटे लढतील, आमच्यात कुठेही विसंवाद नाही, असे सांगत ते म्हणाले, ज्या लोकांनी खासदारकीला विरोधात काम केले. कसल्याही परिस्थिती त्यांना तिकिट दिले जाणार नाही. त्याबाबत वरिष्ठांकडून खात्री करुन घेतली आहे. वरिष्ठही त्याला सहमत आहेत, अशी त्यांनी स्पष्टोक्ती दिली.