विधानसभा मतदान प्रक्रियेचे कामकाज आटोपून रात्री अडीच वाजता भुईंज येथील तलाठ्याचा भुईंज येथे घरी जात असताना मोटारसायकलचा भीषण अपघात झाला. ऊस भरून उभी असलेल्या ट्रॉलीला पाचवडजवळ पाठीमागून बाईकची धडक बसल्याने रोहित अशोक कदम (वय 28) यांचा अपघाती मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तलाठी रोहित कदम यांची निवडणुकीच्या कामकाजासाठी आलेवाडी येथे नियुक्ती झाली होती. मतदान प्रक्रियेचे दिवसभर कामकाज करून मतपेट्या सातारा येथे जमा केल्या. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या दरम्यान ते सातारहून आपल्या भुईंज या मूळगावी मुक्कामासाठी निघाले होते. ते पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील उडतरे-पाचवडदरम्यान आले असता महामार्गावर उसाने भरलेली ट्रॉली उभी होती. या ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावले नसल्याने रोहित कदम यांना ती दिसून आली नाही. त्यामुळे त्यांची मोटारसायकल ट्रॉलीला जाऊन धडकली. या धडकेत रोहित यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने डोक्यातून रक्तस्त्राव झाला. यावेळी महामार्गावरील प्रवाशांनी या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना कळवली.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कदम यांना अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात केले. मात्र, डोक्यातून अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भुईंज गावावर शोककळा पसरली आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह गुरूवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. भुईंज येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.