ना. फडणवीस हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. ना. देवेंद्र फडणवीस हेच गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील.
सातारा : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. ना. देवेंद्र फडणवीस हेच गरजू मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.
ना. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळूच शकणार नाही, असे काही लोक म्हणत होते, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले होते. मात्र, ना. फडणवीस यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर काही लोक मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात कोर्टात गेले होते. कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्याने या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकला नव्हता.
मराठा समाजातील गरजू लोकांना आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. न्यायहक्कासाठी लढणं, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मात्र, ते घटनेत आणि कायद्यात टिकायला हवे. जरांगे पाटील यांच्या मुद्द्याला आमचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे. त्यांना आम्ही भेटलो होतो. समाजाच्या गरजेचा हा मुद्दा आहे. सरकारसोबत चर्चा केल्याशिवाय हा मुद्दा सुटणार नाही. चर्चा करुन आरक्षण आपल्या पदरात कसे पडेल, हे मराठा समाजाने पाहावं. मीही मराठा समाजातील आहे. समाजातील अनेक घटकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. या समाजातील एक व्यक्ती म्हणून गरजू मराठ्यांसाठी आरक्षण आवश्यक आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. महायुतीचे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाठी आग्रही आहे. ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील, असा विश्वासही ना. शिवेंद्रराजेंनी व्यक्त केला.