रेडियम फलक न लावणाऱ्या ट्रॅक्टर चालकांविरोधात कारवाई करा
सातारा जिल्ह्यात ऊस तोड हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक सुरू झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात ऊस तोड हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे ऊस वाहतूक सुरू झाली आहे. मात्र, अनेक ट्रॅक्टर चालकांकडून वाहतुकीदरम्यान सुरक्षा नियमांचा भंग होत असल्याचे समोर आले आहे. विशेषत: साखर कारखान्यांकडून देण्यात आलेले रेडियम फलक, बोर्ड वाहनांवर न लावल्याने रात्रीच्या वेळेस अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वाहनचालकांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक साखर कारखान्याकडून ऊस वाहतुकीसाठी नेमलेल्या ट्रॅक्टरला ओळख पटावी तसेच इतर वाहनचालकांना अंधारात वाहनाची उपस्थिती जाणवावी, यासाठी रेडियम फलक किंवा बोर्ड देण्यात आले आहेत. हे फलक न लावल्यास रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक वाढते. मात्र, अनेक ट्रॅक्टर चालक हे फलक न लावता ऊस वाहतूक करत असल्याने रस्त्यांवर धोका निर्माण होत आहे. अंधारात किंवा धुक्याच्या वातावरणात या वाहनांची ओळख न पटल्याने गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
अलीकडेच ऊस वाहतूक करणाऱ्या काही ट्रॅक्टरमुळे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांच्या वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावर पुरेशी जागा न मिळाल्याने वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली, तर काही भागांत झालेल्या अपघातांमुळे जीवितहानीसुद्धा झाली आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टरची तपासणी करून रेडियम फलक लावले आहेत का याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करावी. साखर कारखान्यांवर जबाबदारी निश्चित करून, त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व वाहनांनी योग्य फलक लावले आहेत याची खात्री करावी.
वाहतुकीदरम्यान सुरक्षा उपायांचे पालन केल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. रेडियम फलकांमुळे अंधारात ट्रॅक्टर सहज दिसतो, त्यामुळे इतर वाहनचालकांना सावधगिरीने वाहन चालवता येते. या नियमांचे पालन न केल्यास केवळ ट्रॅक्टर चालक नव्हे, तर सामान्य नागरिकांचाही जीव धोक्यात येतो, अशी भावना नागरिक व प्रशासनातील काही जबाबदार घटकांनी व्यक्त केली आहे.