उरमोडी च्या काठावर राजकीय चर्चेचा काथ्याकुट
सातारा पालिकेत राजकीय मनोमिलन बाजूला ठेवून आपण सर्व भाजपचे असा अभिनिवेष सध्या दोन्ही राजांनी घेतला आहे.
सातारा : सातारा पालिकेत राजकीय मनोमिलन बाजूला ठेवून आपण सर्व भाजपचे असा अभिनिवेष सध्या दोन्ही राजांनी घेतला आहे. दोन्ही राजांच्या उरमोडी धरणाच्या काठावरील राजकीय चर्चेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या मुद्द्यावर चर्चेचा काथ्याकुट झाला. नगराध्यक्ष हा लोकाभिमुख व प्रशासनावर नियंत्रण ठेवणारा असावा या विषयावर जरी एकमत झाले तरी तो कोण ? या मुद्द्यावर दोन्ही राजांचे बराच काळ चर्चा होऊ नये एकमत होऊ शकले नाही. याशिवाय काही प्रभागातील उमेदवारी आणि तेथील राजकीय समीकरणे याबाबतही निर्णय प्रलंबित राहिला आहे.
खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साताऱ्याचा नगराध्यक्ष आणि उमेदवारांची अंतिम यादी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाच्या काठावर एका फार्म हाऊस वर राजकीय चर्चेची पहिली बैठक शुक्रवारी दुपारनंतर रंगली. या बैठकीला लोकसभा संयोजक सुनील काटकर सातारा विकास आघाडीचे माजी पक्षप्रतोद दत्तात्रय बनकर, सातारा विधानसभा संयोजक अविनाश कदम, नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अमोल मोहिते इत्यादी यावेळी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता रविवार वगळता केवळ 24 तास उरले आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी एबी फॉर्म राखून ठेवत अंतिम उमेदवारांची यादी सुद्धा गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांचा जीव टांगणीला लागला असल्याने नक्की साताऱ्याचे राजकीय समीकरण कोणते वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कार्यकर्त्यांच्या भावना आणि त्याची तीव्रता लक्षात घेऊन दोन्ही राजांनी दुपारनंतर उरमोडी धरणाच्या शांत परिसरात राजकीय चर्चा करण्याचे ठरवले आणि त्यानुसार बैठकीला सुरुवात करण्यात आली. सातारा विकास आघाडीचे कट्टर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील उमेदवार संग्राम बर्गे, अविनाश कदम, अमोल मोहिते यांच्या नावावर दोन्ही राजांच्या मध्ये चर्चा करण्यात आली. मात्र नगराध्यक्ष पदाच्या सातारा विकास आघाडीच्या प्रस्तावाला शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोध केल्याची माहिती आहे. तसेच प्रभाग क्रमांक 8 / 9 व 21 येथील उमेदवारी निश्चिती याबाबतही चर्चा झाली. प्रभागाची आरक्षणे आणि इच्छुक उमेदवारांचे इलेक्टिव्ह मेरिट याबाबतही दोन्ही राजांनी बरेच मुद्दे मांडले. साताऱ्याचा लोकमान्य व राजमान्य नगराध्यक्ष कोण याबाबत एकमत न झाल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. बैठकीमध्ये झालेले निर्णय सुद्धा गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत. साताऱ्याचे नगराध्यक्षपद नेमके कोणाकडे जाणार असा प्रश्न उपस्थित झाल्याने दोन्ही आघाड्यांचे भावी नगरसेवक संभ्रमित झाले आहेत.