अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुल खाडे निलंबित
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहूल खाडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केले असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सातारा : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहूल खाडे यांना आरोग्य विभागाने निलंबित केले असून यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महिलांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. डॉ. राहुल खाडे यांच्याकडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार होता. गेल्या दोन वर्षांपासून ते सिव्हिलमध्ये कार्यरत होते.
त्यांच्याविषयी महिलेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे तसेच आरोग्य उपसंचालकांकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने सिव्हिलमध्ये येऊन तक्रारीविषयी चौकशी केली होती. संबंधित तक्रारीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता.
डॉ. राहुल खाडे यांच्या विरोधात काही महिलांनी आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने तक्रारीचे गांभीर्य ओळखून ही बाब गंभीर स्वरूपाची असून तात्काळ त्यांचे निलंबन करणे हे शासनाला उचित वाटल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
आता हे निलंबन आदेश जोपर्यंत अंमलात आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ च्या नियमा मधील तरतुदीनुसार डॉ. राहुलदेव खाडे यांना खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा स्वतःला कोणत्याही व्यापार उद्योगधंद्यामध्ये गुंतवून घेता येणार नाही. जर निलंबनाधीन असताना डॉ. राहुलदेव खाडे यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा स्वतःला व्यापार किंवा उद्योगधंद्यामध्ये अडकवून घेतले तर त्यांनी गैरवर्तन केल्याचे लक्षात घेऊन ते निर्वाहभत्ता मिळण्यास अपात्र ठरणार आहेत.