छत्रपती कृषी 2025 प्रदर्शनात लक्ष वेधून घेणार गिनीज बुक मधील राधा म्हैस
स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा येथील श्री छत्रपती कृषी महोत्सव 2025 प्रदर्शनामध्ये यावर्षी दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या महोत्सवात सादर करण्यात येणारे राधा नावाची जगातील सर्वात कमी उंचीची सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय ठरलेली अशी ही म्हैस.
सातारा : स्मार्ट एक्सपो यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सातारा येथील श्री छत्रपती कृषी महोत्सव 2025 प्रदर्शनामध्ये यावर्षी दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान सर्वात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या महोत्सवात सादर करण्यात येणारे राधा नावाची जगातील सर्वात कमी उंचीची सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय ठरलेली अशी ही म्हैस.
या म्हशी बद्दल माहिती देताना या प्रदर्शनाचे संयोजक व प्रमुख मार्गदर्शक सोमनाथ शेटे म्हणाली की, सातारा येथे यावर्षी भरणारे हे प्रदर्शन चौथ्यांदा आम्ही मोठ्या आनंदाने भरवत आहोत .मागील तीन प्रदर्शनामध्ये विविध आकर्षणे सादर केल्यामुळे यावेळी ही जागतिक स्तरावर गिनीज बुकात नोंद झालेली राधा नावाची म्हैस सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या म्हशी बद्दल सर्वच सातारा जिल्ह्यातील नागरिकांना विशेष आकर्षण असून जानेवारी २०२५ रोजी 'राधा'ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत याने 'राधा'च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. यात पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी म्हशीची पाहणी करून अहवाल सप्टेंबरमध्ये पाठवला.शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच मुऱ्हा म्हशीच्या पोटी जून २०२२ मध्ये 'राधा'चा जन्म झाला. 'राधा' दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीत बदल होत नसल्याचे बोराटे यांच्या लक्षात आले. त्यानंतर बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने 'राधा'ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. डिसेंबर २०२४ मध्ये सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा 'राधा'ने सहभाग घेतला. अन् 'राधा'चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी, कर्नाटकातील निपाणी यांसह एकूण १३ कृषी प्रदर्शनांत खास आकर्षण म्हणून 'राधा'ला निमंत्रित करण्यात आले.
२८ ऑक्टोबर रोजी 'राधा'ची जगातील सर्वांत बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या म्हशीसाठी ओला व सुका चारा दररोज बारा किलो, पेंड, गव्हाचे पीठ, भुसा सकाळी व संध्याकाळी दोन दोन किलो दिला जातो. तिचे वजन २८५ किलो आहे. यापुढे देशातील सर्वांत मोठ्या आणि आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात 'राधा'ला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आमची 'राधा' प्रत्येक कृषी प्रदर्शनात सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून, सामान्य शेतकऱ्यांसह अनेक मान्यवर व तज्ज्ञांच्या आकर्षणाची ती केंद्रबिंदू ठरत आहे. 'राधा'ची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात 'राधा'ला सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती या राधा म्हशीचे पशुपालक अनिकेत बोराटे यांनी दिली.
या सर्व मिळालेल्या माहितीनुसार समस्त जिल्हावासियांनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 19 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान अवश्य भेट देऊन विविध प्रकारच्या माहितीपूर्ण स्टॉल तसेच खरेदीचा आनंद घेत आपला आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सातारा येथील छत्रपती कृषी महोत्सव 2025 प्रदर्शनात सादर होणारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली जगातील सर्वात राधा नावाची कमी उंचीची म्हैस.
- अतुल देशपांडे ,सातारा.