लढाई सोपी नाही पण जिंकण्यासाठी लढणार
राजकारणाच्या प्रांतामध्ये मी अगदीच नवखा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साताऱ्याच्या भूमीचा मी शिलेदार आहे.
सातारा : राजकारणाच्या प्रांतामध्ये मी अगदीच नवखा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या साताऱ्याच्या भूमीचा मी शिलेदार आहे. सातारा शहराच्या नैसर्गिक रचनेचे कोंदण हे एकमेवद्वितीय आहे. येथील पायाभूत सुविधांचा विकास करणे, पारदर्शी कारभार करणे, व्यवस्थेत बदल असे हेतू घेऊनच मी नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत उतरत आहे. दिगजांच्या समोर मी अगदीच नवखा असून मला ही लढाई सोपी नाही पण ही लढाई मी जिंकण्यासाठी लढणार आहे असा आत्मविश्वास डॉक्टर संदीप काटे यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये डॉक्टर संदीप काटे यांचे नाव मुलाखतीनंतर चर्चेत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दैनिक प्रभात मे डॉक्टर संदीप काटे यांच्याशी संवाद साधला. या संवादामध्ये डॉक्टर काटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले आपण साताऱ्यात राहतो आणि सातारा बदलला पाहिजे असे आपण नेहमी बोलत असतो. मात्र येथील बदलाची प्रक्रिया अत्यंत संथ पद्धतीने चालत आहे. रोजगारासाठी आपल्या तरुणांना साताऱ्याच्या बाहेर जावे लागते, साताऱ्यात काय आहे ? असे आजची पिढी बोलते तेव्हा अंतःकरणाला वेदना होतात. आपण समाजाची बांधिलकी मानतो समाजाचे देणे लागतो. सातारा शहर आणि येथील व्यवस्था, पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण, या गोष्टीत बदल घडवायचा असेल तर प्रामाणिक संघटनात्मक कामाची गरज आहे. या दृष्टीनेच मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सातारा राजधानी ही छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. येथील लढवय्या बाणा विचारधारेमध्ये भिनलेला आहे. नगराध्यक्ष पदाची स्पर्धा माझ्यासारख्या नवख्या माणसासाठी निश्चित सोपी नाही मात्र राजकीय अनुभव नसला तरी ही निवडणूक मी जिंकण्यासाठीच लढणार आहे. माझी प्रचार फेरी अगदी साधेपणाने प्रसंगी वेळ पडल्यास सायकल वरून जाऊन मतदारांशी मी संवाद साधणारआहे अशी प्रांजळ भावना डॉक्टर काटे यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने माझी साताऱ्यात ओळख आहे. पण सातारा शहर बदलण्यासाठी कुठून तरी सुरुवात करायला हवी. कॉम्रेड हिल मॅरेथॉन तसेच आय सी एन गोवा अशा शारीरिक तंदुरुस्तीच्या स्पर्धा मध्ये मी भाग घेत असतो. जगातील 17 देश मी फिरलो आहे. नुकतीच जॉर्जिया देशाची राजधानी तिबलिसी या देखण्या शहराचा मी दौरा केला. ही राजधानी म्हणजे साताऱ्याचे दुसरे प्रतिबिंब आहे. शहराच्या लगत किल्ला, किल्ल्यावर रेडिओ टॉवर, शहराच्या पूर्वेला नदी, किल्ल्याचा नैसर्गिक उतार सर्व भौगोलिक गोष्टी अगदी येथे साताऱ्यासारख्याच आहेत. फक्त फरक स्वच्छता, पायाभूत सुविधांचे विस्तारीकरण, कुत्र्यांचे वारंवार होणारे निर्बिजीकरण, जवाबदार स्थानिक स्वराज्य संस्था आणि जबाबदारीची जाणीव असणारे नागरिक यामुळे या राजधानीत वावरताना वारंवार साताऱ्याचा भास होत होता. जर येथे राजकीय व्यवस्था सुंदर राजधानी घडवू शकते तर महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याची राजधानी असणारी सातारा शहर सुद्धा बदलले जाऊ शकते ही प्रामाणिक भावना असल्याचे डॉक्टर संदीप काटे यांनी व्यक्त केली.