ना. शिवेंद्रसिंहराजे भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीत निवड केली आहे.
सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाजपने स्टार प्रचारकांच्या यादीत निवड केली आहे. राज्यातील 242 नगरपालिका निवडणुकांच्या संदर्भाने होणाऱ्या राजकीय सभांसाठी त्यांना निमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे. सध्या शिवेंद्रसिंहराजे सातारा जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख म्हणून सक्रिय आहेत.
गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाची तत्काळ अंमलबजावणी आणि पक्षशिस्तीचा प्रोटोकॉल, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकींना उपस्थिती, शिवाय चौकटीत काम करण्याची सवय व उत्तम संघटन कौशल्य यामुळे अल्पावधीतच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव भाजपच्या वरिष्ठ कार्यकारणीच्या श्रेय नामावलीत सामील झाले आहे. सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली ताकद पणाला लावली होती. त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे. मुंबईमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पक्ष कार्यकारिणीच्या श्रेष्ठींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीची सभा पार पडली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व निर्णयांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घेतला.
या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांच्यासह स्टार प्रचारक म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नावाला सुद्धा पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची राजकीय घौडदौड राज्यात सुरू ठेवण्याकरता पक्षाच्या आदेशानुसार शिवेंद्रसिंहराजे यांना विविध नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने होणाऱ्या राजकीय सभांना जावे लागणार आहे. सातारा जिल्ह्यातही 10 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील भाजप लढत असून तेथील राजकीय समीकरणे जुळवणे आणि तेथे भाजपचा उमेदवार निवडून आणणे, ही सर्व जबाबदारी शिवेंद्रसिंहराजे यांच्या खांद्यावर आहे.