नाट्यमय घडामोडीनंतर अपक्षांची नेत्यांसमोर शरणागती
भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील नेत्यांनी बंडखोर अपक्षांना कारवाईचा दम भरल्यानंतर शुक्रवारी साताऱ्यात नाट्यमय घडामोडी झाल्या.
सातारा : भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील नेत्यांनी बंडखोर अपक्षांना कारवाईचा दम भरल्यानंतर शुक्रवारी साताऱ्यात नाट्यमय घडामोडी झाल्या. अपक्षांची समजूत घालणे, समन्वय बैठका, मनधरणी अशा अनेक टप्प्यातून जात एकूण तीन दिवसात 89 उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे सातारा शहरात अंतिम चित्र स्पष्ट झाले असून पन्नास जागांसाठी 178 उमेदवार आता निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी साठी नऊजण रिंगणात असल्याचे समोर आले.
शुक्रवारी नेत्यांची झालेल्या चर्चेनंतर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील अशोक राजाराम मोने, बाळासाहेब पुंडलिक शिंदे, सुहास एकनाथ मोरे, शिवाजी नारायण भोसले, शंकर रामचंद्र माळवदे यांनी माघार घेतली. त्यामुळे येथे 14 उमेदवारांपैकी पाच जणांनी माघार घेतल्याने नऊ उमेदवारांमध्ये आता या पदासाठी लढत होणार आहे. नगरसेवक पदासाठी एकूण 339 उमेदवारांनी अर्ज भरले होते. गेल्या दोन दिवसांमध्ये एकूण 14 उमेदवारांनी दोन दिवसात अर्ज माघारी घेतले तर शेवटच्या दिवशी 70 उमेदवारांनी नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने मनोमिलनाची शिष्टाई यशस्वी झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक प्रभाग 11 मधून वसंत लेवे, प्रभाग 15 मधून श्रीकांत आंबेकर यांच्या पत्नी स्वाती आंबेकर, प्रभाग 13 मधून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक दत्तू धबधबे, प्रभाग 21 मधून किशोर पंडित, प्रभाग क्रमांक 12 मधून पोपट कुंभार, प्रभाग 15 ब मधून उदयनराजे यांचे समर्थक अमोल पाटोळे यांच्या पत्नी पल्लवी पाटोळे, प्रभाग 14 ब मधून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अक्षय गवळी, 21 अ मधून धनंजय पाटील, प्रभाग क्रमांक 14 ब मधून नासिर शेख, 21 ब मधून सागर पावशे यांच्या पत्नी रूपाली पावसे इत्यादी दिग्गज चर्चेतल्या नगरसेवकांनी अचानक माघार घेतली.
भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही नेत्यांनी ठरवून दिलेल्या नगरसेवकांना निवडून आणण्याच्या दृष्टीने अपक्षांना थांबवणे अत्यंत गरजेचे होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जे आवाहनाला प्रतिसाद देतील त्यांना सांभाळून घेऊ अन्यथा पक्ष कारवाई करू अशी तंबी दिल्याने अपक्षांनी लढाईची शस्त्रे खाली टाकली. भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक आणण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी केलेली राजकीय शिष्टाईला यश येऊन अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी एकूण 75 जणांनी माघार घेतली. त्यामध्ये नगरसेवक पदाच्या स्पर्धेतील 70 तर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील 5 अशा 75 जणांनी माघार घेतली.
अपक्षांचे फोन स्विच ऑफ, दबाव तंत्राची फोनाफोनी
शुक्रवार दिनांक 21 रोजी उमेदवारांसाठी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नेत्यांनी मनोमिलनातील उमेदवारांना दगा फटका होऊ नये यासाठी अपक्षांना थेट फोन करून त्यांच्याशी समन्वय चर्चा करणे आणि त्यांना अर्ज माघारी साठी प्रवृत्त करणे हे तंत्र ठेवले होते. बऱ्याच शिष्टाई यशस्वी झाल्या तर काही अपक्ष फोन स्विच ऑफ करून साताऱ्यातून गायब झाले होते. शाहूपुरीतील चर्चेतील उमेदवार संजय पाटील, तर प्रभाग क्रमांक 5 मधील शिवानी ताई कळसकर हे साताऱ्यातून बाहेर असल्याने तेथील राजकीय प्रयत्न यश आले नसल्याची माहिती आहे.