भारतीय जनता पार्टी सोडून समविचारी पक्षांशी युती करणार
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही. रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे.
सातारा : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला गळती लागली म्हणजे संपले असे नाही. रिकाम्या जागा भरून काढण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकणे हे जितके महत्त्वाचे तितकेच निवडणुकीत भूमिका घेणे महत्त्वाचे आहे आणि महाविकास आघाडीने त्या संदर्भात भूमिका घेतलेली आहे. जिल्ह्यात महायुतीला टक्कर देण्यासाठी भाजप वगळून समविचारी पक्षांशी युती करून निश्चित चांगली लढत देऊन असा आत्मविश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
येथील राष्ट्रवादी भवनामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी शशिकांत शिंदे यांनी स्वतः उमेदवारांशी चर्चा करून बऱ्याचशा निवडी अंतिम केल्याची माहिती आहे.
त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, साताऱ्यातील सुसंस्कृत वर्ग तसेच तरुण-तरुणी यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगला प्रतिसाद आहे. इतर मागास प्रवर्गाचे प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीला नाकारून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या समविचारी पक्षांना साथ देत आहे, त्याचे प्रतिबिंब साताऱ्यात दिसत आहे. ओबीसीच्या संदर्भाने राज्य शासनाने बरेच उलट सुलट निर्णय घेऊन संभ्रमावस्था निर्माण केली आहे त्यामुळे या प्रवर्गामध्ये असंतोष आहे. सातारा शहरातही महाविकास आघाडी जास्तीत जास्त उमेदवार उभे करून पूर्ण ताकतीने निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.
महाविकास आघाडी सातारा जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे पुन्हा आपल्या अस्तित्व निर्माण करेल भारतीय जनता पार्टी बघून कोणत्याही समविचारी पक्षांशी आमची युती असणार आहे. स्थानिक समीकरणांना महत्त्व देऊन आणि जनमताचा कानोसा घेऊन जन मान्यतेने उमेदवार दिले जात आहेत असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. साताऱ्याचे बारा वर्ष एकाच ठिकाणी असणारे मुख्याधिकारी तसेच नेत्यांच्या मर्जीतील नगराध्यक्ष अशा विविध प्रश्नांवर बोलते केले असता शशिकांत शिंदे म्हणाले महाविकास आघाडीची जर सत्ता साताऱ्यात आली तर घडलेल्या घटनांचा आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही जरूर केली जाईल. नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुक व दिग्गज आमच्या संपर्कात आहे. मात्र बरेच काही आत्ताच सांगता येणार नाही आपण काही काळ प्रतीक्षा करावी परिणाम आपल्यासमोर दिसतील असे शिंदे यांनी स्पष्ट केले.