शाहूवासीय यंदा बदल घडविणार
सातारा नगरपालिकेची निवडणूक दोन्ही राजेंच्या मनोमिलनातून झाली तर 50 जागांसाठी खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीला 22, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीला 28 जागा, असे जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते आहे.
सातारा नगरपालिकेची निवडणूक दोन्ही राजेंच्या मनोमिलनातून झाली तर 50 जागांसाठी खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीला 22, तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगर विकास आघाडीला 28 जागा, असे जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे समजते आहे. जागा वाटपात भाजपच्या इच्छुक उमेदवारांना त्यांच्या कार्यकर्तृत्वावर नेत्यांकडून संधी दिली जाणार असली तरी मूळ भाजपच्या 15 ते 16 जागांमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार खासदार उदयनराजे यांच्याकडे राहणार आहे, असे वाटत असले तरी त्यामध्ये शहराच्या राजकारणात मोठा बदल दिसून येणार आहे. यावेळी काहीही झाले तरी नगराध्यक्ष पद नगरविकास आघाडी आपल्याकडे खेचून आणणारच, असे चित्र एकंदरीत दिसून येत आहे.
आपल्या अनोख्या स्टाईलने किंवा मिश्किल वक्तव्याने नेहमी चर्चेत राहणारे आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारे खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांसमोर पुन्हा एकदा गुगली टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. आपल्याला आता खासदारकीचा राजीनामा देऊन सातारा नगरपालिकेचा नगराध्यक्ष व्हायचंय, अशी मजेशीर प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी नुकतीच मध्यम प्रतिनिधींना दिली. याआधी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष व्हायची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर आता तशीच मजेशीर इच्छा खा. उदयनराजे यांनी बोलून दाखवली आहे.
सातारा जिल्ह्यात नऊ वर्षानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यानुषंगाने सातारा जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली. आगामी पालिका निवडणुकीचे नियोजन कसे असावे, याची त्यामध्ये जोरदार चर्चा झाली. त्या बैठकीनंतर बोलताना खा. उदयनराजे यांनी सातारा नगरपालिकेमध्ये शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाबरोबर मनोमिलन झाल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी नगराध्यक्ष पदाची मिश्किल प्रतिक्रिया दिली.
सातारा नगरपालिकेबाबत खासदार उदयनराजेंनी मनोमिलनाबाबत सकारात्मकता जरी दाखवली असली तरी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मात्र मनोमिलनाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोडल्यामुळे दोघांच्या मनोमिलनाबाबत सस्पेन्स पहायला मिळत आहे. येत्या पाच-सहा दिवसांत अंतिम निर्णय होईल. भाजप श्रेष्ठी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील तो सर्वसामान्य लोकांच्या हिताचा निर्णय असेल आणि तो सर्वमान्य असेल, अशी प्रतिक्रिया ना. शिवेंद्रसिंहराजेंनी दिली आहे.
सातारा नगरपालिकेत यंदा नक्की वर्चस्व कोणाचे?
नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत खासदार उदयनराजेंच्या पॅनल ने मोठे मताधिक्य मिळवत शिवेंद्रसिंहराजेंच्या पॅनल चा पराभव केला होता. त्यामध्ये उदयनराजे गटाच्या माधवी कदम यांनी नगराध्यक्ष पदाच्या लढतीत शिवेंद्रसिंहराजेंच्या पत्नी श्रीमंत सौ. वेदांतिकाराजेंचा तीन हजार हून अधिक मतांनी पराभव केला होता. शाहूवासीयांनी खा. उदयनराजे यांच्या प्रेमाखातर माधवी कदम यांना निवडून दिले होते. त्यांच्या कार्यकाळात जनतेची मात्र निराशाच झाली. नगरसेवकांनीही आपल्या जबाबदाऱ्या बाजूला ठेवून फक्त निधी लाटण्याचे काम केल्याचे दिसून आले. हे फक्त सामान्य जनतेच्या लक्षात आले असे नाही, तर दस्तुरखुर्द ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही एका कार्यक्रमात भावी नगरसेवक बिले काढणारा नसावा, असे बोलून दाखवले. म्हणजेच गेल्या पंचवार्षिक मध्ये जनतेच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाल्याचे त्यांनाही पटले आहे. गेल्या नऊ वर्षात जनतेवर लागलेल्या जोगाळातून मुक्त होण्याची वेळ आता आली आहे. राजे आमचे तुमच्यावर प्रेम आहे, ते आम्ही दाखवून दिले. आता मात्र सारासार विवेक बुद्धीने विचार करण्याची वेळ आली आहे आणि त्याचा सूर जनतेतून उमटु लागला आहे.
विकास आणि प्रगतीची सांगड घालून चालायचे असेल तर यावेळी मात्र जनतेचा कौल श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे 2025 च्या निवडणुकीत श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले या नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घालूनच लेकीच्या विवाह समारंभात मिरवणार असल्याचे निर्विवाद सत्य दिसत आहे..!
- पलाश जवळकर