शिरवळ येथील महार वतन जमीन प्रकरणी खंडाळा तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चौकशी करा
शिरवळ येथील महार वतन जमीन प्रकरणी खंडाळा तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय स्वाभिमानी संघाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघाचे पश्चिम महाराष्ट्र पूर्णकालीन प्रचारक तुषार मोतलिंग यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.
सातारा : शिरवळ येथील महार वतन जमीन प्रकरणी खंडाळा तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी भारतीय स्वाभिमानी संघाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर संघाचे पश्चिम महाराष्ट्र पूर्णकालीन प्रचारक तुषार मोतलिंग यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.
याबाबत माहिती अशी, शिरवळ, ता. खंडाळा येथील इनामवर्ग ६ ब सर्वे नं. ८ गट क्र. ३/३/१/१, ३/१/२, ३/२ मधील महार वतन जमीन प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला असून दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी भारतीय स्वाभिमानी संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघाचे पूर्णकालीन प्रचारक तुषार मोतलिंग व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०१२ मध्ये महार वतन उठवण्यासाठी विभागीय आयुक्तांची परवानगी अनिवार्य असताना, खंडाळा तहसीलदार यांनी कोणतीही आवश्यक शासकीय मंजुरी न घेता स्वतःहून महार वतन उठवले. या प्रक्रियेत मूळ मालकांची संमतीदेखील घेतलेली नाही. सर्कल व तलाठी यांनी सादर केलेली कागदपत्रे चुकीची असून त्यांच्या कारभारातही गंभीर त्रुटी आढळत आहेत.
अपर जिल्हाधिकारी, सातारा यांनी १ जानेवारी २०१९ रोजी विभागीय आयुक्तांना या सर्व अनियमिततेबाबत स्पष्ट असा अहवाल पाठवलेला असल्याचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, महार वतन जमिनीत माता लक्ष्मी मंदिरासाठी २० गुंठे आणि स्मशानभूमीसाठी सुमारे साडे पाच एकर जमीन आरक्षित असताना त्या नोंदी हटवून चुकीच्या नोंदी लावण्यात आल्या. जुना रस्तादेखील नष्ट करून नव्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय शीतल अहुजा, गुरुमुख सुखवानी व विजय जसुजा यांनी महार वतन जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याबाबत खंडाळा तहसीलदार यांच्या १०/१०/२०१६ च्या पत्राची प्रतही सोबत जोडण्यात आली आहे.
तक्रारदारांनी पुढे म्हटले आहे की, संबंधित खरेदीदार आर्थिक व राजकीयदृष्ट्या प्रभावी असल्याने शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाजातील नागरिकांना धमकावण्याची घटना घडत असून पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करून तहसीलदार, सर्कल, तलाठी आणि संबंधित सर्व दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी राहुल जाधव, अजय कांबळे, सौरभ कांबळे, किशोर झेंडे, मयुर कांबळे, प्रमोद काळे, महेश आवडे, हरीभाऊ शेरे तसेच महिला, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.