दोन जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : दोन जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रतीक बापूराव दळवी रा. जकातवाडी, ता. सातारा हे त्यांच्या मित्रांसमवेत एकीव, ता. जावली येथील हॉटेल जय मल्हार मध्ये जेवण करण्यास गेले होते. त्यावेळी तेथे काहीजण तसेच तीन ते चार नृत्यांगना संगीताच्या तालावर नाचत होत्या. यावेळी काही कारण नसताना श्रेयस श्रीधर भोसले याने दळवी यांचा मित्र धीरज शेळके यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून दळवी यांनी का मारले, असे विचारले असता भोसले याने हातातल्या बाटलीने दळवी याच्या डोक्यात व पाठीत मारून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तसेच श्रेयस श्रीधर भोसले रा. सातारा, सोन्या जाधव, रोहन जाधव, अमर पवार (पूर्ण नाव, पत्ते माहिती नाहीत), समीर सलीम कच्छी रा. सैदापूर, ता. सातारा आणि त्यांच्या इतर साथीदारांनी संबंधितांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी व बियरच्या बाटल्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत संबंधितांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.