संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्या. धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्या. धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात न्या. निकम यांच्यावतीने सातारा न्यायालयात दाखल करण्यात आलेला अंतरिम जामिन फेटाळण्यात आला. दरम्यान, तात्पुरत्या अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज दाखल केला असून त्याबाबत उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. अद्याप इतर कोणत्याही संशयिताला अटक झालेली नाही.
सातारा जिल्हा न्यायालयातील जिल्हा व सत्र न्या. धनंजय निकम, आनंद खरात, किशोर खरात व अनोळखी एकाविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील तक्रार युवतीचे वडील न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहेत. युवतीने जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्याची सुनावणी न्या. धनंजय निकम यांच्याकडे सुरु होती. जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच जामीन मिळवून देण्यासाठी मदत करतो असे सांगून आनंद खरात, किशोर खरात हे युवतीला भेटले. मात्र त्यासाठी 5 लाख रुपये प्रोटोकॉल म्हणून द्यावे लागतील, असे संशयितांनी सांगितले. लाचेची मागणी झाल्याने युवतीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) तक्रार केली. गेल्या दहा दिवसात पुणे एसीबीने याप्रकरणी पडताळणी केली असता त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच सुरुवातीला न्या. धनंजय निकम हे युवतीला भेटले असल्याचेही युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
जामीनासाठी लाचेची रक्कम सातार्यातील हॉटेलमध्ये घेण्याचे ठरल्यानंतर मात्र आनंद खरात, किशोर खरात व अनोळखी एकाला संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम न स्वीकारता तेथून धूम ठोकली. अखेर पुणे एसीबीने दहा दिवसातील घडलेल्या सर्व घटनेची माहिती एकत्र करुन सातारा शहर पोलिस ठाण्यात न्यायाधिशासह चौघांवर लाच मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवस उलटल्यानंतरही कोणाला अटक करण्यात आलेली नाही. याचा तपास पुणे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल कटके करत आहेत.
गुरुवारी न्या.धनंजय निकम यांच्यावतीने अॅड. ताहेर मणेर यांनी सातारा जिल्हा न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला. मात्र, हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे लगेचच त्यांच्यावतीने तात्पुरत्या अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला गेला. यावेळी बचाव पक्षाच्यावतीने युक्तिवादही झाला. त्यानुसार पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. यामध्ये सरकार पक्ष व पुणे एसीबीच्यावतीने म्हणणे सादर होईल. यामुळे उद्या सुनावणीमध्ये काय होणार? याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.