कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे.
सातारा : कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारी तीन जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे करणारी टोळी प्रमुख बजरंग सुरेश माने रा. बुधवार पेठ कराड, चेतन श्याम देवकुळे रा. बुधवार पेठ कराड आणि किशोर पांडुरंग शिखरे रा. गोवारे, ता. कराड या टोळीवर कराड शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारी सह अग्निशस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करून शिवीगाळ दमदाटी करणे, साधी दुखापत करून शिवीगाळ दमदाटी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. त्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के. एन. पाटील यांनी या टोळी विरुद्ध पूर्ण सातारा जिल्ह्यातून तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी केली होती.
या टोळीतील इसमांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. संबंधित इसम सातत्याने गुन्हे करीत होते. त्यांचा कराड शहर तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. या टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी संबंधितांना सातारा जिल्ह्यातून तसेच सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्याच्या हद्दीतून दोन वर्षाकरिता हद्दपारचा आदेश पारित केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून 32 उपद्रवी टोळ्यांमधील 103 जणांना, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे 34 जणांना, 57 प्रमाणे चार जणांना अशा एकूण 41 इसमांविरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा कारवाया करण्यात येणार आहेत.
या सुनावणी कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पोलीस कॉन्स्टेबल केतन शिंदे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा सणस, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव, हर्षल सुखदेव, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनाली पिसाळ यांनी योग्य पुरावा सादर केला.