चौदा कोटींच्या फसवणूकप्रकरणी उद्योजकावर गुन्हा
तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीतील वरुणेश्वर ऑरगॅनिक कंपनीचे मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पाच जणांवर १४ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
वहागाव : तासवडे (ता. कराड) येथील औद्योगिक वसाहतीतील वरुणेश्वर ऑरगॅनिक कंपनीचे मालक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह पाच जणांवर १४ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा तळबीड पोलिस ठाण्यात नोंद झाला आहे.
मुंबई व तासवडे येथील क्लियरसिंथ लॅब कंपनीचे कार्यकारी संचालक पी. बी. गिरासे यांनी याबाबतची तक्रार पोलिसांत दिली आहे. प्रांजित पंजाबराव पाटील, प्रियंका पंजाबराव पाटील, पंजाबराव विठ्ठलराव पाटील, अमरजित पंजाबराव पाटील (सर्व. रा. वारुंजी, ता. कऱ्हाड) व सुनील वामनराव ढोकणे (रा. ३०१, तिसरा मजला, आटोपिया बिल्डिंग, आळंदी रोड, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई येथील क्लियरसिंथ लॅब ही कंपनी औषधनिर्मिती करते. या कंपनीला ग्रामीण भागात कंपनीची शाखा निर्माण करून ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी पी. बी. गिरासे यांनी तासवडे व सातारा एमआयडीसीत चौकशी केली. त्या वेळी प्रांजित पाटील याने त्यांच्याशी चर्चा करून सुरुवातीला एमओयू करार करत दहा कोटी रुपयात प्रांजित पाटील यांची वरुणेश्वर ऑरगॅनिक ही कंपनी विक्री करण्याचे ठरले.
त्यानंतर संशयितांनी जानेवारी २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत वेळोवेळी १४ कोटी ११ लाख रुपये घेऊन बीटीए कराराची नोंदणी करण्यास नकार दिला. या करारावरील स्वाक्षरी आमच्या नाहीत, असे सांगून क्लियरसिंथ लॅब कंपनीला भूखंड हस्तांतर करून दिला नाही.