कोल्हापूर कोर्टात हाणामारी

मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर अखेर हल्ला करण्यात आला आहे.
कोल्हापूर : मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकरवर अखेर हल्ला करण्यात आला आहे. न्यायालयीन परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलीस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटरला आज पुन्हा एकदा कोल्हापूरच्या सत्र न्यायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी, दोन्ही बाजुंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे, आता 30 मार्चपर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलिसांच्या कोठडीत असणार आहे. कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी-कुणी मदत केली, ऑनलाइन पेमेंट कोणी दिलं, यासह आणखी तपास बाकी असल्याने पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांच्या बाजूने करण्यात आली होती.
प्रशांत कोरटकरला आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात केलं हजर करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश एस.एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानुसार, आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड.सूर्यकांत पोवार तसेच, इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे अॅड. असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले होते. तर, प्रशांत कोरटकर याच्यातर्फे अॅड. सौरभ घाग प्रत्यक्ष उपस्थित होते.
कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले आले. ते या ठिकाणी कोर्टामध्येच आले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.
या आधीच कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी पोलिसांनी येऊ दिले नव्हते. पोलिसांनी कडेकडे बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र एक वकीलच या ठिकाणी आला जो मूळचे रुकडी मधले राहणारे आहेत. अमित कुमार भोसले असे त्यांचे नाव आहे. ते या ठिकाणी आले आणि त्यांनी ज्या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला बाहेर काढलं जातं, त्या ठिकाणी ते थांबले होते.
पोलिसांनादेखील या ठिकाणी संशय आला नाही. कारण ते मुळात वकील आहेत आणि वकील असताना ते हल्ला करतील असं वाटलं नाही.
हे परशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करतोस का अशा पद्धतीचं एक वाक्य बोलला आणि त्याच्यानंतर त्याने तो हल्ला केला. या हल्ल्यानंतर सगळी धावपळ उडाली. ज्या वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला केला, त्या वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले.
महत्त्वाचं म्हणजे कोर्ट परिसरात खूप मोठी पोलीस प्रोटेक्शन लावलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठीचा प्रयत्न होता कोल्हापूर पोलिसांनी केला होता. मात्र तरी देखील या ठिकाणी प्रशांत कोरटकरवर हल्ला झाला.
मागच्या वेळी सुद्धा ज्या व्यक्तीने पायताण फेकून हल्ला केला होता ती व्यक्ती देखील याच ठिकाणी थांबली होती. मात्र यावेळी वकिलाने हल्ला करुन एकप्रकारे पोलिसांना गाफिल ठेवलं.
पोलिसांनी खबरदारी म्हणून कोर्टाच्या परिसरामध्ये कुणालाही या ठिकाणी येऊ दिलं नव्हतं. जो वकील होता तो सकाळपासून या ठिकाणी कोल्हापूर न्यायालयाच्या पूर्ण आवारामध्ये फिरत होता. ज्यावेळी सुनावणी पूर्ण झाली, युक्तिवाद झाला आणि ऑर्डर द्यायच्यावेळी तो खाली जाऊन थांबला. जशी ऑर्डर आली, तसं पोलीस कोरटकरला खाली घेऊन गेले. त्याचवेळी या वकिलाने प्रशांत कोरटकरवर हल्ला केला.