फसवणूकीच्या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या कश्मिरा पवारसह तिच्या साथीदारांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात आणखी एक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर देण्याचे आमिष दाखवून 14 कोटी 49 लाख रुपये 50 हजार 163 रुपयांना चुना लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कश्मिरा संदीप पवार (रा.सदरबझार, सातारा), गणेश हरीभाउ गायकवाड (रा.गडकरआळी, सातारा), युवराज भिमराव झळके (रा.कामाठीपुरा, सातारा) यांच्यासह अनिल वायदंडे या मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रमोद तानाजी जगताप (वय 48, रा.संभाजीनगर, सातारा सध्या रा. धायरी, पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना 2017 ते जुलै 2023 या कालावधीत घडली असल्याचे तक्रारदार प्रमोद जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार यांचा फॅब्रीकेशनचा व्यवसाय आहे. संशयित कश्मिरासह सर्वजण त्यांना भेटले. कश्मिरा ही पंतप्रधान कार्यालयामध्ये पंतप्रधान यांची राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून तशी कागदपत्रे संशयितांनी दाखवली. संरक्षण मंत्रालय भारत सरकार यांना 215 कोटी रुपयांचे साहित्य पुरवण्याचे टेंडर तुम्हाला मिळवून देतो, असे संबंधितांनी जगताप यांना सांगितले. तसेच फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जम्मू काश्मीर यांना 197 कोटी रुपयांचे धान्य पुरवण्याचेही टेंडर देतो, असेही सांगितले.
संशयितांनी तक्रारदार यांना याबाबतचे टेंडर कॉपी, त्याबाबतची इतर सर्व कागदपत्रे, पत्रे दाखवून तसे व्हॉट्सअप व ई-मेलवर पाठवून बनावट टेंडर देवून तक्रारदार यांच्याकडून 1 कोटी 46 लाख रुपये 50 हजार रुपये व 1 कोटी 3 लाख रुपये किंमतीचे सोने घेतले. तसेच तक्रारदार यांचे पार्टनर योगेश हिंगणे यांच्याकडून 12 कोटी रुपये घेऊन एकूण 14 कोटी 49 लाख 50 हजार 163 रुपयांची संबंधितांनी फसवणूक केली आहे. पैसे घेतल्यानंतर संशयितांनी कोणतेही प्रत्यक्ष टेंडर दिले नसल्याचे तक्रारदार व त्यांचे पार्टनर यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याने अखेर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.