दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण
दारू पिण्यासाठी उधारीने पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून एकाला त्याच्या मित्राने बेदम मारहाण करण्यात आली.
सातारा : दारू पिण्यासाठी उधारीने पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून एकाला त्याच्या मित्राने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अजित भानुदास कदम (वय 26, रा. महादरे, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, प्रथमेश प्रकाश कुलकर्णी (रा. नेने चौक, मंगळवार तळे, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 15 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मंगळवार तळ्याशेजारील आंब्याच्या झाडाखाली घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजित कदम आणि प्रथमेश कुलकर्णी हे दोघे मित्र आहेत. मंगळवार तळयाजवळ ते दोघे उभे होते. त्यावेळी प्रथमेश कुलकर्णी याने त्याला दारू पिण्यासाठी उधारीने पैसे मागितले. मात्र, हे पैसे देण्यास नकार देताच प्रथमेश याने त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. तो जमिनीवर खाली पडला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. त्यामुळे अजित रक्तबंबाळ झाला. हातावर, पायावर लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी अजितवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, डोक्यात टाके घालण्यात आले आहेत. हवालदार वाघ अधिक तपास करीत आहेत.