दिव्यांग बांधवांना कृत्रिम मॉड्युलर पाय बसवण्याची सोय
भारत विकास परिषद पुनर्वसन केंद्र पुणे, विलो मेंदर अँड प्लांट पंप प्रायव्हेट लिमिटेड व रोटरी क्लब पुणे पश्चिम, पुसेगाव देवस्थान ट्रस्ट व लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 16 नोव्हेंबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी विशेष कृत्रिम मॉड्युलर पाय, हात आणि कॅलिपर मोफत बसवण्याचे मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सातारा : भारत विकास परिषद पुनर्वसन केंद्र पुणे, विलो मेंदर अँड प्लांट पंप प्रायव्हेट लिमिटेड व रोटरी क्लब पुणे पश्चिम, पुसेगाव देवस्थान ट्रस्ट व लक्ष्मणराव इनामदार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 16 नोव्हेंबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी विशेष कृत्रिम मॉड्युलर पाय, हात आणि कॅलिपर मोफत बसवण्याचे मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी 300 दिव्यांग बांधवांची नोंदणी अपेक्षित आहे.
याबाबतची माहिती दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यवस्थापक जयंत साठे यांनी दिली. यावेळी केंद्राचे केंद्रप्रमुख विनय खटावकर, राजेंद्र जोग, दत्ता चितळे, रोटरी क्लब ऑफ
पुणे वेस्टचे अध्यक्ष संतोष चिपळूणकर, पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे रणधीर जाधव, लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टचे सुहास जोशी इत्यादी यावेळी उपस्थित होते.
जयंत साठे म्हणाले, भारत विकास परिषद दिव्यांग पुनर्वसन ही संस्था गेल्या पंचवीस वर्षापासून दिव्यांग पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी आहे. दिव्यांग केंद्राने एप्रिल 2025 मध्ये एकाच शिबिरात 892 दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम नोंदवला आहे. रोटरी क्लब व भारत विकास परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने पुसेगाव येथील सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट येथे दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव बसवण्याकरता मापे घेण्यात येणार आहेत.
यावेळी दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉड्युलर पाय विषयी माहिती दिली. ते म्हणाले, आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय 300 दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपुर फूट पेक्षा हे आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय बसवल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे व शेती कामे आदी प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात. त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जाते. सकाळी 11 ते सायंकाळपर्यंत हे शिबिर आहे. कृत्रिम मॉड्युलर पाय याची बाजारपेठेत किंमत 50 हजारापेक्षा जास्त इतकी आहे. हे पाय दिव्यांग बांधवांना मोफत बसवले जाणार आहेत. मोजमाप निश्चिती नंतर प्रत्यक्ष पायरोपणाच्या संदर्भातील सुधारित कार्यक्रम पुढील टप्प्यांमध्ये कळवला जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी शिबिरासाठी फोनद्वारे आपली पूर्व नोंदणी करावी. याशिवाय शिबिराला प्रवेश मिळणार नाही, असे आवाहन जयंत साठे यांनी केले आहे. दिव्यांग बांधवांनी कुलकर्णी - 9422029946, विनोद - 9881138052 यांच्याशी संपर्क साधून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. पूर्व नोंदणी शिवाय शिबिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही संयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
प.पू.श्री. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव येथे रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व दिव्यांगांची कृत्रिम अवयवासाठी मापे घेण्यात येणार आहेत. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन, चहा इ. सोय आहे. दत्ता चितळे यांनी आभार व्यक्त केले.
या शिबिरासाठी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सुजाता खटावकर, सुधीर अभ्यंकर, स्मिता जोशी, विनायक भिसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.