सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला
सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 10 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची घोषणा केली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 10 नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने या प्रक्रियेची घोषणा केली. दिनांक 10 नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी, तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यात 115 प्रभागातून 233 उमेदवार मतदारांना निवडून द्यायचे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषेत राज्यातील 246 नगरपालिका व 42 नगरपंचायती यांच्या निवडणुक कार्यक्रमांची घोषणा केली. यानुसार सातारा जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून यापुढे पालिका कार्यक्षेत्रामध्ये नवीन घोषणा तसेच जाहीर कार्यक्रम यांना मर्यादा येणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करणे प्रक्रिया 10 नोव्हेंबर पासून सुरू होत असून 17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. 18 नोव्हेंबर रोजी छाननी आणि अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर आहे. 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप, त्यानंतर लगेच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.
सातारा जिल्ह्यात सातारा वर्ग नगरपालिकेसह कराड, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर, मेढा या दहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील 115 प्रभागातून 233 नगरसेवक हे जिल्ह्यातील मतदारांना निवडून द्यावयाचे आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातील 139, अनुसूचित जातीमधील 32, इतर मागास प्रवर्गातील 60 आणि अनुसूचित जमाती मधील दोन असे नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. सातारा पालिकेच्या सर्वाधिक 50, कराड नगरपालिकेच्या 31, वाई नगरपालिकेच्या 23, फलटणच्या 27, महाबळेश्वर- पाचगणी- रहिमतपूर- म्हसवड यांच्या प्रत्येकी 20, मेढा नगरपंचायतीच्या 17, तर मलकापूर नगरपंचायतीच्या 22 जागांवर निवडणूक होणार आहे.
राजकीय मोर्चेबांधणीला येणार वेग
भारतीय जनता पार्टीने नगरपालिका निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन ऑपरेशन लोटस जिल्ह्यात ठिकठिकाणी राबवून इन्कमिंग प्रोसेस जोरात ठेवली आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पुढील सोमवारी होत आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट व शिंदे गटाचे यापूर्वी दोन-दोन मेळावे झाले असून बूथ प्रमुख ते केंद्रप्रमुख यांच्या याद्या तपासण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी व शिंदे गट दोन्ही जिल्ह्यात ऍक्टिव्ह मोडवर आले असून अजित दादा गटाचे मदत व पुनर्वन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांनी आघाडी घेतली आहे. या अनुषंगाने लवकरच राष्ट्रवादी गटाची बैठक होत आहे. शिंदे गटाची सातारा जिल्ह्यातील धुरा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः खांद्यावर घेतली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शिवसेनेचा एक मोठा गट राष्ट्रवादीच्या पंखाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून येत्या सोमवारी शशिकांत शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती मिळते आहे. मात्र अद्याप या माहितीला दुजोरा मिळाला नसला तरी अपक्ष आणि नाराजांना चुचकारणे हे त्यांना महत्त्वाचे ठरणार आहे.