२८८ आमदारांमध्ये पृथ्वीराजबाबा सभ्य आणि सुसंस्कृत नेते आहेत. मंत्रालयातील सचिवांना बाबाच मुख्यमंत्री हवे आहेत. अशा माणसावर फुले टाकायला पाहिजेत. पण त्यांच्यावर असभ्य बोलता, हे चुकीचे आहे. ते राजकारणातील संत आहेत. असा राज्याचा प्रमुख होणारा नेता कराड दक्षिणमधून निवडून जाईल, याची काळजी घ्या. असे प्रतिपादन माजी आ. रामहरी रूपनवर यांनी केले.
कार्वे (ता. कराड) येथील काँग्रेस महाविकास आघाडीच्या झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. भास्करराव थोरात अध्यक्षस्थानी होते. आ. पृथ्वीराज चव्हाण, अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, फारुख पटवेकर, प्रकाश पाटील, संभाजी काकडे, संभाजी चव्हाण, नितीन ढापरे, प्रा. धनाजी काटकर, रंगराव थोरात, जयवंतराव थोरात, वैभव थोरात, अधिकराव जगताप, डॉ. सुधीर जगताप, रोहित पाटील, जे. डी. मोरे, शिवाजीराव जाधव, संतोष जाधव, अक्षय सुर्वे, मराठा महासंघाचे नेते जनार्दन देसाई, प्रकाश पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे विश्वासराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. रामहरी रूपनवर म्हणाले, संविधानमधील निम्मी घटना भाजपच्या नेत्यांनी बदलली आहे. पंतप्रधान आणि दोन मंत्रीच निवडणूक आयोग नेमतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका होत नाहीत, म्हणजेच घटना बदलली आहे की नाही हे समजावून घ्या. भाजपवाल्यांनी जनतेच्या मालकीच्या कंपन्या विकल्या. यातून या मंडळींना पुन्हा हुकुमशाही आणायची आहे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दहा वर्षे भाजप आणि संघाचे राज्य होते. त्यांच्या प्रगती पुस्तकावर नापास हा शेरा मारला. एकाही प्रश्नाचं सोडवणूक होत नाही. पुन्हा तेच होणार आहे. राज्यात सत्ताबदल करा.
अॅ ड. उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, देशाचा सर्वांगीण विकास काँग्रेसच्या माध्यमातून झाला. त्याचबरोबर बहुजन समाज शिक्षित झाला. कृषी, औद्योगिक विकासाचा पायाही काँग्रेसने उभा केला. हे काम लोकप्रतिनधींनी केले. त्यामध्ये पृथ्वीराज बाबांचाही सहभाग आहे. उद्यापासून अमिषांचा पूर येणार आहे. कामगारांची यादी बनणार आहे. यातील काहीही घडणार नाही. त्यांना केवळ समाजाला झुलवायचे आहे. मानसिकता सरंजामशाहीची असणाऱ्या मंडळींची आपणाला लाभार्थी म्हणण्याची भाषा आहे
अजितराव पाटील म्हणाले, विलासकाकांनी भोसलेंना वारुळाच्या बाहेर येवू दिले नाही. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना मत म्हणजे राज्याच्या नेतृत्वाची जबाबदारी येईल. पक्ष बदलणाऱ्या अतुल भोसले यांना कदापि थारा देवू नका.
फारुख पटवेकर, जनार्दन देसाई, अॅ ड. विकास जाधव, डॉ. सुधीर जगताप, रामभाऊ दाभाडे यांची भाषणे झाली. अशोकराव थोरात यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.
जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप म्हणाले, मी लाभार्थी आहे, असे म्हणणाऱ्या लोकांनी माझ्या मुलाचा पाय काढण्यापर्यंत उपचार नेले. असे टोकाचे कृत्य करणाऱ्या अतुल भोसले यांनी मला लाभार्थी म्हणू नये, खरे सत्य सांगितले तर तुम्ही उघडे व्हाल. अतुल भोसले यांच्या पणजोबाने गावची सोसायटी जाळली, हा तुमचा इतिहास आहे. सभासदांच्या पैशाच्या जीवावर ही मंडळी ऊसाचा प्रतिटन ४९७ रुपये दर कमी देवून विधानसभेचा खेळ खेळत आहेत.