सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला विक्रमी प्रतिसाद
श्री सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्स्पो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
खटाव : श्री सेवागिरी महाराजांच्या 77 व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व स्मार्ट एक्स्पो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील शेतकरी व रोजगाराच्या संधी शोधणारा युवक वर्ग प्रदर्शनात आवर्जुन हजेरी लावताना दिसत आहे.
या प्रदर्शनामध्ये शेतीसाठी उपयुक्त असणारे हायटेक टेक्नॉलॉजीचे तंत्रज्ञान, शेती पूरक व्यवसायासह शेतीशी निगडित नामांकित कंपन्यांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात प्रगतशील शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाची माहिती घेताना शेतकरी पहावयास मिळत आहेत. या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून ट्रस्ट निश्चितच ग्रामीण भागातील शेतकर्यांना नवीन ऊर्जा निर्माण करून देत आहे.
शेतकर्यांनी शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे, त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या, शासनाच्या नवीन योजना यांच्या प्रात्यक्षिकांचे मॉडेल्स जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातील कर्मचार्यांनी प्रदर्शनात तयार करुन मांडली आहेत. त्यात पौष्टिक तृणधान्ये आरोग्यविषयक महत्त्व, डिजीटल इंडिया डिजीटल फार्मर, नैसर्गिक शेती मिशन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, बांबू लागवड, यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन यासह अन्य योजना तेथे ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गावाच्या विकासासाठी राबवण्यात येणार्या नवनवीन शेतीपूरक संकल्पनांची माहिती स्टॉलवर देण्यात येत आहे.
पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. पी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लावलेल्या पशू प्रदर्शनातील त्रिंबक दाजी बोराटे (मलवडी, ता. माण) यांची जगातील सर्वात बुटकी म्हैस राधा ही खास आकर्षण ठरत आहे. तर अभिजित यादव यांचा मुर्हा जातीचा रेडा, बळीराम देशमुख यांचा एचएफ जातीचा दीड टनाचा बैल तसेच खिलार जातीची जनावरे शेतकर्यांसह अबाल वृद्धांचे लक्ष वेधत आहेत. प्रदर्शनात विविध माहितीपूर्ण स्टॉल लावण्यात आले असून जिल्हा परिषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेने लावलेल्या स्टॉलची पाहणी करण्यासाठी उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. फायबरचे स्टॉल, स्टॉलची आकर्षक मांडणी, फॅनची सोय, स्वच्छता, भव्यता हे प्रदर्शनाचे आकर्षण ठरत आहे. एक जानेवारी अखेर हे कृषी प्रदर्शन असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व स्मार्ट एक्स्पोचे संचालक सोमनाथ शेटे यांनी केले आहे.