सातारकरांना अस्सल गावरान चवीच्या फराळाची मेजवानी
उमेद अंतर्गत स्वयम सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळ पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री जिल्हा परिषद मैदानावर काल पासून सुरू झाले.
सातारा : उमेद अंतर्गत स्वयम सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या दिवाळी फराळ पदार्थांचे भव्य प्रदर्शन व विक्री जिल्हा परिषद मैदानावर काल पासून सुरू झाले. यानिमित्ताने सातारकरांना अस्सल गावरान चवीचे शुद्ध आणि सात्विक फराळाचे पदार्थ उपलब्ध झाले आहेत. यास नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशणी नागराजन यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक विश्वास सिद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा अभियान व्यवस्थापक अंकुश मोटे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
ग्रामीण भागातील बचत गटात कार्यरत महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला शहरी बाजारपेठ मिळावी आणि शहरी भागातील लोकांना अस्सल गावरान चवीचे पदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अर्थात उमेद अभियानाच्या माध्यमातून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेला आहे. सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत सातारा जिल्हा परिषद मैदानावर दिवाळी खरेदी प्रदर्शन सर्वांसाठी खुला राहणार आहे. यात ग्रामीण भागातील बचत गटातील महिलांनी तयार केलेले शुद्ध व अस्सल गावरान चवीचे दिवाळी फराळाचे पदार्थ, सुवासिक साबण, अत्तर, सुगंधी तेल, सुगंधी उटणे आदी साहित्यासह बरेच काही खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून करण्यात आले आहेत. या महोत्सवामुळे शहरवासीयांना अस्सल गावरान चवीचे शुद्ध फराळाचे पदार्थ खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद
'अस्सल ग्रामीण चवीचे शुद्ध सात्विक खाद्यपदार्थ मिळण्याबरोबरच वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासह त्यांच्या कुटुंबात दिवाळीचा आनंद फुलवण्याची संधी मिळणार आहे.'
याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद सातारा.