ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा साताऱ्यात भव्य मोर्चा
ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने सातारा शहरातून हुतात्मा उद्यान ते शिवतीर्थ पोवई नाका मार्गे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
सातारा : ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने सातारा शहरातून हुतात्मा उद्यान ते शिवतीर्थ पोवई नाका मार्गे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर भव्य मोर्चा काढण्यात आला. गेल्या सात दिवसापासून प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या महासंघाच्या आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ग्रामविकास मंत्री यांची वेळ काढू धोरणाचा यावेळी निश्चित करण्यात आला.
हा मोर्चा महासंघाचे राज्य अध्यक्ष तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला आहे. साताऱ्यातून निघालेल्या या मोर्चामध्ये सुमारे साडेपाचशे हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. अभयावलकर समितीच्या अहवालातील शिफारशी मान्य करणे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणे, शासन अनुदान वेतनासाठी असलेली कर वसुली व उत्पन्नाची अट कायमची रद्द करणे, ऑगस्ट 2020 ते मार्च 2022 पर्यंतची मागील सर्व फरकाची रक्कम मादा करणे, ऑनलाईन वेतन प्रणाली मध्ये सुधारणा लोकसंख्येच्या आकृतीबंधात सुधारणा ग्रॅच्युईटीची मर्यादा पेन्शन तसेच जिल्हा परिषद अंतर्गत दहा टक्के आरक्षणातून रिक्त पदांची भरती इत्यादी मागण्या महासंघाच्या असून त्याबाबत ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासनी नागराजन यांनी ग्राम विकास मंत्र्यांबरोबर बैठक लावली जाईल अशी आश्वासने दिली होतीत. मात्र गेल्या सात दिवसापासून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलक संतप्त झाले.
आंदोलकांनी हुतात्मा उद्यान चौक ते शिवतीर्थ असा भव्य मोर्चा काढला तेथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरून जिल्हा परिषदेकडे मार्गस्थ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. जयकुमार गोरे यांनी या मागण्याची तात्काळ दखल घ्यावी जर सरकारने या मागण्याची दखल घेतली नाही, तर येत्या 8 ऑक्टोबर रोजी राज्यातील 75000 ग्रामपंचायती कर्मचारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर मोर्चा काढतील असा इशारा देण्यात आला.