सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी गोलबागेचा रस्ता बंद
राजवाडा परिसरातील गोलबाग येथे पालिकेच्या बांधकाम विभागाने मोती चौकाकडून गोलबागेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. यादोगोपाळ पेठ व भवानी पेठेतील सर्व व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी व्यवस्थित जलवाहिनीच्या माध्यमातून यानंतर शुक्रवार पेठेतील ओढ्यात सोडण्यात येणार आहे.
सातारा : राजवाडा परिसरातील गोलबाग येथे पालिकेच्या बांधकाम विभागाने मोती चौकाकडून गोलबागेकडे जाणारा रस्ता बंद केला होता. यादोगोपाळ पेठ व भवानी पेठेतील सर्व व्यापारी आस्थापनांचे सांडपाणी व्यवस्थित जलवाहिनीच्या माध्यमातून यानंतर शुक्रवार पेठेतील ओढ्यात सोडण्यात येणार आहे. त्या कामाकरिता दोन दिवस रस्ता बंद राहणार असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.
बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच अचानकपणे मोती चौकाकडून गोल बागेकडे जाणारा रस्ता बंद ठेवला होता. त्यामुळे वाहन चालकांना तांदूळ आळीतून राजवाड्यावर यावे लागले. येथे दोन फूट व्यासाच्या मोठ्या नऊ पाईप टाकल्या जाणार आहेत. गोलबाग परिसरामध्ये सातत्याने सांडपाणी रस्त्यावर येऊन रस्त्याला खड्डे पडणे किंवा रस्त्याची दुरुस्ती वाया जाणे असे प्रकार घडत होते. तसेच वाहतुकीला सुद्धा सांडपाण्याचा अडथळा होत होता. त्यामुळे पालिकेने गोल बागेसमोरून ते थेट जुन्या ट्रान्सपोर्ट ऑफिस पर्यंत रस्त्याची डावी बाजू पूर्णपणे खणून तेथे पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले होते. या कामाकरता बांधकाम विभागाचे 15 कर्मचारी तेथे उपलब्ध होते. येथील सांडपाणी पाईपलाईनच्या माध्यमातून शुक्रवार पेठेतून वाहणाऱ्या ओढ्यात सोडले जाणार आहे. सांडपाणी रस्त्यावर यामुळे येणार नाही आणि रस्त्याच्या कामाचा दर्जा कायम राहील. येत्या 48 तासांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येईल, असे बांधकाम अभियंता प्रतीक वैराट यांनी सांगितले.