‘जलसमाधी’ला महू धरणग्रस्तांचा विरोध

आमचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय महू धरणातील पाण्याचा एक थेंबही खाली सोडू देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर खालचे आणि वरचे असा वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजणार्या ‘त्या’ नेत्यांच्या जलसमाधी आंदोलनात आमचा एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही.
भिलार : आमचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय महू धरणातील पाण्याचा एक थेंबही खाली सोडू देणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर खालचे आणि वरचे असा वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजणार्या ‘त्या’ नेत्यांच्या जलसमाधी आंदोलनात आमचा एकही प्रकल्पग्रस्त सहभागी होणार नाही, असा खणखणीत इशारा महू धरणग्रस्तांनी दिला आहे. शुक्रवारी प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या भिंतीवर एकत्र येऊन नियोजित आंदोलनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली.
लाभक्षेत्रातील शेतकर्यांना पाणी मिळावे, या मागणीसाठी येत्या 3 तारखेला काही राजकीय नेत्यांनी जलसमाधी आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे. मात्र, गेल्या 29 वर्षांपासून स्वतःच्या हक्कांसाठी एकाकी लढा देणार्या धरणग्रस्तांना या आंदोलनामागे राजकीय षडयंत्राचा वास येत आहे. ज्या नेत्यांनी आजवर आमच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर मौन बाळगले, त्यांना अचानक लाभधारकांचा पुळका का आला? असा संतप्त सवाल विचारत धरणग्रस्तांनी या आंदोलनाला विरोध केला आहे.
यावेळी आक्रमक धरणग्रस्तांनी नेत्यांना खडे बोल सुनावले. हरीभाऊ गोळे म्हणाले, आम्ही तुम्हाला आमचे नेते समजतो, पण तुम्हाला आमच्या भुकेऐवजी लाभधारकांची जास्त चिंता आहे. तर महू धरणग्रस्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रांजणे म्हणाले, 1996 साली धरणाचा पाया रचला गेला, तेव्हापासून आमचे प्रश्न प्रलंबित आहेत. तुम्ही आंदोलनातून ’खालचे-वरचे’ वाद लावून आपली पोळी भाजत आहात. आमदार शिवेंद्रराजेंनी प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलली, पण प्रशासनाने ते तडीस नेले नाही. आमचे प्रश्न सुटतील, तुम्ही यात लुडबुड करू नका.
रांजणीचे माजी सरपंच संतोष रांजणे यांनी, फक्त पाण्यासाठी आंदोलन करणार्यांनी आमच्या पुनर्वसनाच्या प्रश्नासाठी आजवर आंदोलन का केले नाही? असा थेट सवाल केला. सुशील गोळे यांनी, लाभधारकांचा पुळका आलेल्या नेत्यांनी धरणावर फिरकू नये, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे ठणकावले. यावेळी ज्ञानेश्वर रांजणे, संतोष रांजणे, सदाशिव गोळे, रामदास रांजणे, उत्तम रांजणे, वहागावचे माजी सरपंच हणमंतराव रांजणे, महूचे सरपंच प्रमोद गोळे, हरीभाऊ गोळे, रमेश रांजणे, सुशील गोळे, बेलोशीचे सरपंच उमेश बेलोशे, माजी सरपंच चंद्रकांत रांजणे, नथुराम रांजणे यांच्यासह असंख्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.