जिल्ह्यात उद्या महास्वच्छता अभियान
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी ''महास्वच्छता अभियान'' राबविण्यात येणार आहे.
सातारा : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात गुरुवार, दि. २५ सप्टेंबर रोजी ''महास्वच्छता अभियान'' राबविण्यात येणार आहे. ''एक दिवस, एक तास, एक साथ'' या संकल्पनेखाली होणाऱ्या या देशव्यापी उपक्रमात जास्तीत जास्त ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ''स्वच्छता ही सेवा'' मोहिम राबवली जात आहे. या वर्षीच्या मोहिमेची थीम ''स्वच्छोत्सव'' ठेवण्यात आली आहे. या अंतर्गत तालुका व गाव पातळीवर अस्वच्छ ठिकाणे निवडून त्यांची मॅपिंग करून स्वच्छता करण्यात येत आहे.
२५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजता गावोगावी मोठ्या प्रमाणावर श्रमदान आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला, बचत गट प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी आणि युवकांचा सहभाग असेल. गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय परिसराची स्वच्छता केली जाणार आहे.झाडू, कचराकुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फावडे, घमेली इ. साहित्य तसेच घंटागाडीची उपलब्धता ग्रामपंचायतींकडून ठेवली जाणार आहे. गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले आहेत.
महा स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी गावपातळीवर विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. गावांमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप, दवंडी, नोटिसा व फलक लावून माहिती देण्यात येईल. जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा यासाठी ग्रामपंचायतींना नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अधिकारी वर्गाचे आवाहन
या उपक्रमाची माहिती देताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) प्रज्ञा माने-भोसले म्हणाल्या की, ''देशव्यापी श्रमदानाच्या या महास्वच्छता अभियानात जिल्ह्यातील प्रत्येक गावाचा सहभाग महत्त्वाचा आहे. ग्रामपातळीवर सामूहिक श्रमदानातून गावांची स्वच्छता राखली जाईल.''