रशियाने इराणची मदत का केली नाही? इस्रायलच्या ‘या’ एका फॅक्टरमुळे सगळं बिघडलं; पुतिन यांनीच...
सध्या मध्य-पूर्वेत तणावाची स्थिती आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले आहे. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे.
दिल्ली : सध्या मध्य-पूर्वेत तणावाची स्थिती आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले आहे. या युद्धात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणवर हवेई हल्ले केले आहेत. या हल्ल्यानंतर इराणने रशियाची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने मात्र या युद्धात तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रशियाने हा निर्णय नेमका का घेतला? असे विचारले जात आहे. याबाबत आता खुद्द रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीच सगळं सांगितलं आहे.
रशिया या युद्धात थेट उतरू शकत नाही, असं पुतिन यांनी म्हटलं आहे. इस्रायलमध्ये रशियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळेच आम्ही या युद्धात थेट उतरू शकत नाही असे पुतिन यांनी म्हटलेय.
यामुळे इराणला दिली नाही साथ
रशिया आणि इराण यांच्यातील संबंध फार जुने आहेत. मात्र इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात रसियाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे इस्रायलमद्ये रशियन लोकांची संख्या फार मोठी आहे. तेथील बरेच लोक रशियन भाषा बोलतात. अशा स्थितीत थेट इराणला साथ दिल्याने इस्रायलमध्ये राहणाऱ्या रशियन लोकांची अडचण होऊ शकते. त्यामुळेच रशियाने या संघर्षात टसस्थ भूमिका घेतली आहे.
पुतिन नेमकं काय म्हणाल्या?
सेंट पिटर्सबर्ग येथील आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेत पुतिन बोलत होते. यावेळी बोलतांना रशियाचे साधारण 20 लाख लोक इस्रायलमध्ये राहतात. आजघडीला इस्रायल हा रशियन भाषा बोलणारा देश आहे. त्यामुळे कोणताही थेट निर्णय घेण्याआधी आम्हाला या तथ्याकडे कानाडोळा करता येणार नाही, असे पुतिन म्हणाले.
रशिया आणि इराण यांच्यातील संबंध मजबूत
यावेळी पुतिन यांनी इराण आणि रशिया यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं. रशियाचे फक्त अरबी देशच नव्हे तर इतरही मुस्लीम राष्ट्रांशी चांगले संबंध आहेत. रसियातील 15 टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. रशिया ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन या संघटनेचाही सदस्य आहे. त्यामुळे इराण आणि रशिया यांच्यातील मैत्रीवर कोणताही प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे, असे पुतिन म्हणाले.
दरम्यान, रशियाच्या या भूमिकेमुळे इराणची अडचण वाढली होती. अमेरिका या युद्धात उतरल्यामुळे आमच्या बाजूने रशिया उभा राहील असे इराणला वाटले होते. इराणने तसा प्रयत्नही केला होता. पण सध्यातरी रशियाने तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे आता इराण अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही राष्ट्रांना कसं तोंड देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.