विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 18 दिवस उलटले तरी अजून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात न आल्याने काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर आले असताना नेता कधी निवडला जाणार, हा प्रश्न पक्षात विचारला जात आहे.
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला 18 दिवस उलटले तरी अजून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात न आल्याने काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अवघ्या चार दिवसांवर आले असताना नेता कधी निवडला जाणार, हा प्रश्न पक्षात विचारला जात आहे.
हरियाणा विधानसभेचा निकाल 8 ऑक्टोबर जाहीर झाला. दोन महिने उलटल्यानंतरही अद्याप हरियाणात काँग्रेसने विधिमंडळ पक्षनेता निवडलेला नाही. त्यामुळे राज्यातही असाच विलंब केला जाईल का, हा प्रश्न येथील काँग्रेस नेते विचारत आहेत. विधिमंडळ पक्षनेता नसल्यामुळे समन्वयाचा अभाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. या पदावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार या ओबीसी नेत्यांमध्ये स्पर्धा आहे. दुसरीकडे, पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून मराठा नेता प्रदेशाध्यक्ष करा, अशी मागणी मराठा नेत्यांनी केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत 105 जागा लढविणार्या काँग्रेसने केवळ 16 जागा जिंकल्या. या दारूण पराभवास कोण जबाबदार, याबाबत कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही. विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी पटोले हे इच्छुक आहेत. वडेट्टीवार हेही या स्पर्धेत आहेत. या दोघांपैकी एक काँग्रेसचा विधिमंडळ पक्षनेता होण्याची शक्यता आहे. तरुण नेत्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपद दिले जाऊ शकते, अशीही काँग्रेसमध्ये चर्चा आहे. जर ओबीसी नेत्याकडे विधिमंडळाचे गटनेतेपद दिले तर मराठा नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले जाईल, अशी काँग्रेसमध्ये चर्चा आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडे जाईल.