डॉक्टर मुंडे आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा
डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून खरी माहिती समोर यावी या आशयाचे निवेदन वंजारी सेवा संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
सातारा : डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून खरी माहिती समोर यावी या आशयाचे निवेदन वंजारी सेवा संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
संघाचे अध्यक्ष राहुल जाधव, सदाशिव खाडे, राज्य सरचिटणीस अरुण खरमाटे, युवा मोर्चा अध्यक्ष रवींद्र खाडे, श्री राजेंद्र माळवे, आबासाहेब हंगे, छगन खाडे, डॉक्टर मधुकर सांगळे, महेश मुकुटराव मुंडे, रवींद्र सानप, अभय जायभाय, इत्यादी सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेतली.
फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे व संबंधितांची नावे स्वतःच्या हातावर लिहून ठेवणे ही घटना अत्यंत दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. तसेच एका खासदाराच्या पी ए च्या मोबाईलवरून देखील सतत दबाव टाकून चुकीची कामे करण्यात दबाव टाकला जात होता. या संदर्भात त्या तरुणीने 19 जून 2025 रोजी पोलीस अधिकाऱ्यांची नावे लिहून कशाप्रकारे लोक त्रास देतात याचा तक्रार अर्ज पोलीस उपविभागीय अधिकारी यांना केला होता, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सुसाईड बूट मध्ये नावे लिहिलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे तसेच जे कोणी फोन करून धमकी देणारे आजी माजी खासदार आहेत त्यांच्यावर देखील कठोर कारवाई व्हावी या प्रकरणाची विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करून संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून दोषी असणाऱ्या आरोपींना शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.