आव्हानांना तोंड देण्यासाठी महिलांनी मानसिक ताकद ठेवावी
युवतींनी आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वावलंबनाचे ध्येय ठेवून नव्या आव्हानांना तोंड देणे गरजेचे आहे.
सातारा : युवतींनी आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्वावलंबनाचे ध्येय ठेवून नव्या आव्हानांना तोंड देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती बरोबर मानसिक दृष्ट्या खंबीर होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सुवर्णपेढी असणाऱ्या पू .ना गाडगीळ व धों आ सातव उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सातवी ते नववी विद्यार्थिनींसाठी शोध किशोरवयीन मनांचा या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहांमध्ये करण्यात आले होते. त्यावेळी दोषी मार्गदर्शन करत असताना बोलत होते.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कारभारी अण्णा चारिटेबल फाउंडेशनचे उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, सचिव प्रशांत सातव, पूना गाडगीळ अँड सन्स लिमिटेड चे मार्केटिंग प्रमुख राजेश सोनी, रिफ्लेक्शन फाउंडेशन पुणे येथील समुपदेशक अनघा डोरले माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव बी. एन. पवार, रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे प्राचार्य बी. टी. जाधव, इत्यादी यावेळी उपस्थित होते.
दोशी पुढे म्हणाले पोलिसांना कायदा सुव्यवस्था सांभाळताना अनेक गुन्ह्यांची प्रकरणे हाताळावी लागतात. यामध्ये युवती बेपत्ता होणे हा पूर्वी मिसिंग प्रकारात मोडला जायचा मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आता याबाबतची गंभीर दखल घेण्यात आली आहे. युवतींनी समाज माध्यमांच्या आभासी जगातून बाहेर पडून वास्तवाचे भान ठेवावे आणि पालकांनी त्यांना तसे वातावरण निर्माण करून द्यावे असा कळकळीचा आग्रह दोषी यांनी धरला. युवतींनी स्वतःच्या संरक्षणासाठी शारीरिक तंदुरुस्ती करणे गरजेचे आहे. तसेच विपरीत परिस्थिती हाताळताना मानसिक दृष्ट्या खंबीर होणे गरजेचे आहे. याकरता आर्थिकस्वावलंबनाचे ध्येय त्यांनी निश्चित वाळवावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एन पवार म्हणाले युवतींना माणसांप्रमाणे परिस्थिती सुद्धा वाचता आली पाहिजे. तुम्हाला निर्णय घेताना आयुष्यात कोणतीही चूक करायची नाही. अनेक प्रसंगांमध्ये युवती भीतीपोटी बोलत नाहीत मात्र त्यांनी व्यक्त झाले पाहिजे. तुम्हाला सर्व युवतींना करिअरच्या दृष्टीने सर्वत्र समान संधी आहेत. युवतींनी आरोग्य आणि ज्ञान या दोन गोष्टींवर लक्ष द्यावे या दोन गुणवत्ता कोणीही आपल्यापासून चोरू शकत नाही. समाज व्यवस्थेच्या जडणघडणीमध्ये युवतींचे मोठे योगदान आहे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रशांत सातव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ट्रस्टचे उपाध्यक्ष हनुमंत मोहिते यांनी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाप्पा पाटील व प्राध्यापिका दीपिका खंडाईत यांनी केले. पु. ना. गाडगीळ सुवर्णपेढीच्या मार्केटिंग विभागाचे प्रमुख राजेश सोनी यांनी सुद्धा यावेळी विचार व्यक्त केले आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून युवतींच्या मानसिक जडणवींचा हा कार्यक्रम आपण आयोजित करण्यामध्ये खारीचा वाटा उचलल्याचे नम्रपणे नमूद केले.