दिल्लीमध्ये २६ जानेवारीपर्यंत विमानसेवा बंद
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGIA) विमान वाहतूक तात्पुरती प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे विमान प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने (DIAL) शनिवारी (दि.१८) जाहीर केले आहे की, १९ जानेवारी २०२५ (रविवार) पासून २६ जानेवारी २०२५ (रविवार) पर्यंत येथील विमानतळावर कोणतेही विमान उतरणार नाही किंवा उड्डाण करणार नाही. प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवासाठी सुरक्षा खबरदारीमुळे वेळापत्रकात बदल करणे आवश्यक असले तरी, त्याचा विशिष्ट वेळेत आगमन आणि निर्गमनांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (IGIA) हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे, जे दररोज सुमारे १,३०० हून अधिक विमान उड्डाण करते. दरम्यान दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (डायल) ने प्रवाशांना अद्ययावत उड्डाण माहितीसाठी संबंधित विमान कंपन्यांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.