लाहोरमध्ये ‘जन गण मन…’, पाकिस्तानमध्ये भारताच्या राष्ट्रगीताचा व्हिडिओ व्हायरल
चँपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पाकिस्तान क्रिकेट मंडळ सोशल मीडियावर टीकेचे लक्ष बनत आहे. आता पीसीबीकडून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी एक घोडचूक झाली. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारतीय राष्ट्रगीत वाजवण्यात आले.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ 22 फेब्रुवारी रोजी राष्ट्रगीतासाठी मैदानात आले. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी मैदान व्यवस्थापनाने भारताचे राष्ट्रगीत वाजवले. व्हिडिओमध्ये ‘भारत भाग्य विधाता’ हे राष्ट्रगीताचे बोल ऐकू येत आहे. मात्र, काही सेकंदातच भारतीय राष्ट्रगीत थांबवण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत लावण्यात आले.
पाकिस्तान मंडळ ट्रोल
पाकिस्तान क्रिकेट मंडळाची ही चूक आश्चर्यकारक आहे. कारण या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानमध्ये एकही सामना खेळणार नाही. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला. त्यानंतर भारताचे सर्व सामने दुबईत खेळत जात आहे. यामुळे आयोजकांची ही चूक गंभीर आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर पीसीबी ट्रोल झाला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. त्याची सुरुवात चांगली झाली आहे.