भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोने काल बुधवारी (दि.४) सूर्याची रहस्ये उलगडण्याच्या उद्देशाने युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) प्रोबा-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला. इस्रोने काल बुधवारी (दि.४) सूर्याची रहस्ये उलगडण्याच्या उद्देशाने युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) प्रोबा-३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करण्यासाठीचा हा महत्त्वाकांक्षी अवकाश उपक्रम आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रोबा-३ चे प्रक्षेपण करण्यात आले. PSLV-C59/PROBA-3 मोहिमेने यशस्वीरित्या प्रक्षेपणाची उद्दिष्टे साध्य केली आहेत. ESA चा उपग्रह त्यांच्या निश्चित कक्षेत अचूकपणे प्रस्थापित करण्यात आला आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ सहकार्यातील ही एक महत्त्वाची मोहीम मानली जात आहे. प्रोबा-३ ही ISRO आणि ESA यांची संयुक्त मोहीम आहे, जी अंतराळ संशोधनातील जागतिक भागीदारीच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करते. हे प्रक्षेपण PSLV चे ६१ वे उड्डाण असून PSLV-XL कॉन्फिगरेशनचा २६ वा वापर आहे.
सूर्याचे रहस्य उलगडण्यात अनेक देश गुंतले आहेत. इस्रोनेदेखील या शर्यतीत PSLV-XL Proba-3 प्रक्षेपित करून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या मोहिमेत अनेक देशांतील शास्त्रज्ञ सहभागी आहेत आणि त्यांचे ध्येय साध्य करण्याची संपूर्ण जबाबदारी इस्रोच्या सर्वात विश्वासार्ह ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहनावर म्हणजेच PSLV वर आहे.
भारताच्या 'PSLV-XL'वाहनावर महत्त्वाची जबाबदारी
इस्रोने याआधीच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते की, या मोहिमेद्वारे ५५० किलो वजनाचे उपग्रह एका अद्वितीय उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत ठेवले जातील. या मोहिमेअंतर्गत, युरोपियन एजन्सीला सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील आणि सर्वात उष्ण थर असलेल्या सौर कोरोनाचा अभ्यास करायचा आहे.
प्रोबा-३ (Proba-3) ही मोहीम इस्रो आणि युरोपीयन अंतराळ संस्था (ESA) यांच्यातील महत्त्वपूर्ण सहकार्य चिन्हांकित करते. ज्याचा उद्देश सूर्याच्या कोरोनाचा अभ्यास करणे, सौर वातावरणाचा सर्वात बाह्य स्तर आहे, जो सौर गतिशीलता आणि अवकाशातील हवामान घटना समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हा उपग्रह अवकाशात अत्यंत लंबवर्तुळाकार कक्षेत अंदाजे १५० मीटरने वेगळा होईल. ज्याठिकाणी उपग्रह सूर्यप्रकाश रोखू शकेल. प्रक्षेपित झाल्यानंतर सेटअप सहा तासांनंतर सतत निरीक्षणे नोंदवण्यात येतील, असेदेखील इस्रोने म्हटले आहे.
कृत्रिम सूर्यग्रहणाचा प्रयोग
प्रोबा-३ मोहिमेमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेले उपग्रह कृत्रिम सूर्यग्रहणासाठी परिस्थिती निर्माण करतील; जेणेकरून सूर्याच्या सर्वात बाह्य थराचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करता येईल, असेही इस्रोने म्हटले आहे.
दोन वर्षांची मोहीम
प्रोबा-३ मोहीम ही स्पेन, पोलंड, बेल्जियम, इटली आणि स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ आहे. दोन वर्षांची ही मोहीम खास आहे. कारण एकाच वेळी दोन उपग्रह सोडले जाणार आहेत. या उपग्रहांना त्यांच्या ठिकाणी अचूकपणे पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. कारण मिशनच्या यशासाठी त्यांचा एकमेकांशी असलेला समन्वय खूप महत्त्वाचा आहे.