समर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार : आ. महेश शिंदे
समर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
सातारा : समर्थ नगरच्या विकास कामांसाठी भरघोस निधी देणार असल्याचे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
समर्थनगर, ता. सातारा येथील 1 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या काँक्रीटीकरण आणि बंदिस्त गटर कामाचा भव्य शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते तसेच सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. सौ. अरुणाताई बर्गे, उपसरपंच संगीता माने, सदस्य विद्या हिरेमठ, सुप्रिया मोरे, शुभांगी डोरले, संजय भोसले, ग्रामपंचायत विकास अधिकारी आर. डी. माने व अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. महेश शिंदे म्हणाले, समर्थ नगरच्या ग्रामपंचायतीने विकासाचा ध्यास घेतलेला आहे. येथील सोसायटीमध्ये करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामानंतर नागरिकांनी मोकळ्या जागेत शोभिवंत झाडे लावावीत. येथील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लोकांना जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक बनवून देणार असल्याचे आश्वासनही आमदार शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी बोलताना डॉ. अरुणाताई बर्गे म्हणाल्या, येथील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे मी कटाक्षाने लक्ष देणार आहे. समर्थ नगर मधील नागरिकांनी नेहमीच आ. महेश शिंदे यांना झुकते माप दिले आहे. त्या अनुषंगाने आ. शिंदेही येथील विकास कामाबाबत कुठेही कमी पडणार नाहीत.
याप्रसंगी समर्थ नगर मधील उपसरपंच व सर्व सदस्य तसेच समर्थ नगर सोसायटी मधील चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव व सर्व ग्रामस्थ, बंधू-भगिनी, अबालवृद्ध उपस्थित होते.