आज कुंडीत लावा बेलाचं रोपं- ९ टिप्स
आज महाशिवरात्रीचा सण सगळीकडेच फार उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानांना फार महत्व असते.
आज महाशिवरात्रीचा सण सगळीकडेच फार उत्साहात साजरा केला जात आहे. या दिवशी भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानांना फार महत्व असते. भगवान शंकराला आपण बेलपत्र वाहून त्याची मनोभावे पूजा करतो. शक्यतो आपल्या प्रत्येकाच्याच घरात येणाऱ्या हाराच्या पुडीमध्ये बेलाचे पान हे असतेच. एवढंच नव्हे तर आपल्यापैकी काही जणांकडे अगदी घरच्या बाल्कनीमधील कुंडीत देखील बेलाचे छोटेस रोपट लावलेलं असत. परंतु काहीजणांची अशी तक्रार असते की हे बेलपत्राच्या रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही किंवा रोपं लगेच सुकून - कोमेजून जाते.
खरंतर, बेलाच्या रोपाची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. फक्त योग्य प्रमाणांत ऊन आणि वेळच्यावेळी पाणी दिले तरीही हे रोप तितक्याच जोमाने वाढते. फक्त उन्हाळ्यात या रोपाची काळजी घेणे आवश्यक असते. बेलाच्या रोपाची वाढ नीट व्हावी किंवा जर आपण पहिल्यांदाच घरच्या कुंडीत बेलाचे रोप लावत असाल तर कोणती काळजी घ्यावी किंवा रोपं कुंडीत कसे लावावे ते पाहूयात.
बेलाचे रोपं बाल्कनीतील कुंडीत लावताना काय काळजी घ्यावी...
१. सकाळी ११ वाजेपर्यंत रोपाला अगदी व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे रोपं ठेवावे. यामुळे रोपात ओलावा टिकवून ठेवण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
२. सुमारे १० इंचाच्या कुंडीतील मातीत सुमारे २०० ते ३०० ग्रॅम गांडूळखत घालावे लागते. दर १५ दिवसांनी गांडूळखत घातल्याने पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते आणि रोपाची वाढ सहज होते. बेलपत्राच्या रोपासाठी शेणखत सर्वोत्तम आहे.
३. सकाळी ८ वाजेपर्यंतच बेलपत्राच्या रोपाला पाणी दिले पाहिजे. यामुळे रोपं ओलसर राहील आणि मुळे देखील थंड राहतील. खरंतर जेव्हा आपण या रोपाला उशिरा पाणी घालतो तेव्हा सूर्यप्रकाशामुळे पाणी हलकेच गरम होते, त्यामुळे रोपांच्या मुळांना कोमट पाणी मिळते ज्याचा रोपाच्या वाढीवर परिणाम होतो.
४. दर १५ दिवसांनी रोपाच्या मातीत बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. असे केल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोपांला बुरशी लागण्याची समस्या येत नाही. यासाठी तुम्ही पाण्यात कडुलिंबाचे तेल मिसळून फवारणी करू शकता.
५. आठवड्यातून एकदा मातीत सेंद्रिय खतं घालावीत. यामुळे रोपाची वाढ सुधारेल आणि ते कायम हिरवेगार राहील.
६. अतिशय कडक ऊन किंवा सूर्यप्रकाशापासून रोपाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाने सुकून जाणार नाही आणि रोप हिरवेगार राहील.
७. बेलपत्राचे रोप कुंडीत लावताना सगळ्यांत आधी माती तपासून पाहिली पाहिजे. आपण वाळू किंवा लाल रंगाच्या मातीची निवड करु शकता.
८. बेलपत्राचे रोप लावण्यासाठी ६.५ ते ७.५ पर्यंत पीएच असलेल्या मातीची निवड करावी. यासाठी सर्वात आधी तुम्हाला मातीचा पीएच तपासून घ्यावा लागेल. जर पीएच कमी किंवा जास्त असेल तर त्याचा रोपाच्या वाढीवर परिणाम होतो.
९. जर तुम्ही बेलपत्राच्या रोपाला वारंवार जास्त पाणी दिले तर रोपाची वाढ नीट होत नाही. हिवाळ्यात आठवड्यातून एकदा आणि उन्हाळ्यात दिवसातून एकदा रोपाला पाणी देणे आवश्यक आहे. जास्त पाणी देणे टाळा.