संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आजी-माजी आमदार, खासदारांची पेन्शन व वेतन रक्कम द्या
मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदतीतून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापि भरून येणारे नाही.
सातारा : मराठवाड्यासह सातारा जिल्ह्यात देखील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदतीतून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापि भरून येणारे नाही. त्यासाठी थोडा हातभार म्हणून गेली अनेक वर्ष पेन्शन आणि वेतन घेत असलेल्या राज्यातील आमदार व खासदारांची कोट्यवधी रुपयांची सहा महिन्याची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे सातारा युवा आघाडी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी केली आहे.
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत हे देखील मदतीसाठी पुढाकार घेणार असून राज्यातील विद्यमान विधानपरिषदेतील २८८ व विधानपरिषदेतील ८५ आमदार तसेच राज्यातील ४८ खासदार यांनी आपले सहा महिन्याचे वेतन अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला द्यावे. त्याचप्रमाणे गेली वर्षोंनु वर्ष पेन्शन घेत असलेल्या माजी खासदार व आमदार यांनी आता शेतकऱ्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असून त्यांनी देखील सहा महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावी, असे आवाहन साबळे यांनी केले आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील उद्योगपती यांनी देखील CSR तरतुदीनुसार त्याच प्रमाणे शासकीय अधिकारी वर्गाने देखील आपले एका महिन्याचे वेतन व तीन महिन्याची पेन्शन शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी, असे देखील आवाहन साबळे यांनी केले आहे.