भाजपचे संकल्पपत्र जाहीर
दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘संकल्पपत्र’ जाहीर केले असून महिलांना दरमहा २५०० रुपयांची मदत तसेच गॅस सिलिंडरसाठी ५०० रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले.
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने ‘संकल्पपत्र’ जाहीर केले असून महिलांना दरमहा २५०० रुपयांची मदत तसेच गॅस सिलिंडरसाठी ५०० रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले.
याशिवाय गर्भवतींना २१ हजार रुपयांची मदत, पोषक आहाराचे किट, ‘अटल कँटीन योजने’द्वारे झोपडपट्ट्यांमध्ये पाच रुपये दराने धान्य, ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयांची पेन्शन, सणाच्यावेळी प्रत्येकी एक गॅस सिलिंडर मोफत, पाच लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा अशा आश्वासनांची खैरात भाजपकडून करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. याचे औचित्य साधत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संकल्पपत्र जारी केले. ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती बदलून टाकली आहे. याआधी राजकीय पक्ष घोषणापत्र आणत असत आणि सोयीनुसार आश्वासने विसरत असत. मात्र आता घोषणापत्राचे रुपांतर ‘संकल्पपत्रा’त झाले आहे.
२०१४ मध्ये भाजपने पाचशे आश्वासने दिली आणि यातील ४९९ आश्वासनांची पूर्तता करण्यात आली,’’ असे नड्डा यांनी सांगितले. ‘‘आश्वासनांची पूर्तता करण्यात भाजप आघाडीवर आहे. आमचे रेकॉर्ड ९९.९ टक्के इतके आहे,’’ असे सांगून नड्डा म्हणाले की, भाजपचे संकल्पपत्र हा ‘विकसित दिल्ली’चा पाया आहे. नव्या योजना लागू करत असताना जुन्या योजनादेखील कायम ठेवल्या जाणार आहेत.
देशातील २५ कोटी लोक गरिबीरेषेच्या बाहेर आले. महाराष्ट्र आणि हरियानात महिलांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यात आली आहे. दिल्लीत सरकार स्थापन झाले तर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महिला समृद्धी योजना लागू केली जाईल. ‘आप’ सरकारने आयुष्मान भारत योजना लागू केली नाही. आम्ही ही योजना लागू करु.
ते म्हणाले, योजनेचा लाभ घेणाऱ्या ५१ लाख लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त विमा कवच दिला जाईल. ‘आप़’ सरकारच्या काळात सुरु झालेल्या मोहल्ला क्लिनिक योजनेत ३०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. आमचे सरकार आल्यास या भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल; तसेच औषध पुरवठ्याच्या निविदेची चौकशी होईल. ६० ते ७० वयोगटातील लोकांना २ हजार रुपयांऐवजी २५०० रुपये इतके निवृत्तीवेतन दिले जाईल.
७० पेक्षा जास्त वयोगटाच्या लोकांना तीन हजार रुपये इतके निवृत्तीवेतन दिले जाईल. संकल्पपत्र तयार करण्यासाठी मते मागवण्यात आली. महिला, युवावर्ग, झोपडपट्टीत राहणारे लोक, असंघटित मजूर, मध्यमवर्ग, व्यापारी यांचे सल्ले विचारात घेण्यात आले. याशिवाय ६२ समूहाशी चर्चा करण्यात आली. १२ हजार सभा घेण्यात आल्या तर ४१ एलईडी व्हॅनच्या माध्यमातून नेत्यांनी गल्लीबोळात संकल्पपत्राच्या अनुषंगाने कानोसा घेण्यात आला, असे नड्डा यांनी नमूद केले.
आप, काँग्रेसकडूनही आश्वासनांचा पूर...
सरकार आल्यास मोफत वीज, पाणी आणि महिलांना मोफत बस प्रवास योजना कायम ठेवल्या जातीलच, पण महिलांना दरमहा २१०० रुपयांची मदत दिली जाईल, असे आश्वासन यापूर्वी आम आदमी पक्षाने दिले होते. ६० वर्षांवरील नागरिकांना सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार उपलब्ध करून देणे, शाळकरी मुलांना बसमध्ये मोफत प्रवास आदी आश्वासने देखील ‘आप’ ने दिले. तर काँग्रेसने सत्ता आल्यास महिलांना दरमहा २५०० रुपयांची मदत, ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, मोफत धान्याचे किट, ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, २५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा अशी आश्वासने दिले आहे.