न उमगलेले उदयनराजे
अखंड हिदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस म्हणून सर्वश्त असलेले; परंतु आपल्या विशेष जीवनशैलीत जगणारे,
अखंड हिदूस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस म्हणून सर्वश्त असलेले; परंतु आपल्या विशेष जीवनशैलीत जगणारे, जनमानसात रमणारे राजकारणविरहित जात, पात, पक्ष संघटना याच्यापलीकडे जाऊन रयतेप्रती तात्त्विक अधिष्ठान सांभाळत सोन्यापेक्षा सोन्यासारखी माणसे जपणारा नेता, एक निसर्गप्रेमी व आपल्या व्यस्त दिनचर्येतून छंद जोपासणारा, कधी भावनांच्या हिंदोळ्यावर वाहणारा निर्मळ झरा होऊन तर कधी अन्यायाविरुद्ध पुकारलेले बंड होऊन संचारलेला रयतेचा राजा म्हणजे खासदार उदयनराजे भोसले...
तरूणाईच्या ह्रदय सिंहासनावर आरूढ...
तमाम तरुणाई उदयनराजे या नावावर बेहद खूश असते. कारण, तरुणाईला अपेक्षित व हटके असा अंदाज व विशेषत: स्वतःची ‘कॉलर स्टाइल,’ तर कधी खचाखच जमलेली गर्दी राजांच्या हटके व फ्लाइंग किस एन्ट्रीने उदयनराजेंवर जान निछावर करते. एरवी सेलिब्रिटींच्या फोटोसेशनसाठी धडपडणारे लोक आपण बघतो. मात्र, राजेंसोबत फोटोसेशनसाठी धडपडणारे तरुण- तरुणी यांचा उदयनराजे कधीही विरस होऊ देत नाहीत. कधी कधी तर आपल्या गाडीची काच खाली घेऊन तरुणांना गाडीसोबत सेल्फीची इच्छा पूर्ण करतात. महाराज पाठमोरे होऊन निघतात, तेव्हा गाडी नजरेआड होईपर्यंत आपल्या काळजात राजांना साठवत भावुक होऊन मायेच्या हिंदोळ्यावर तरुणाई झुलते.
मुख्यमंत्री फडणवीस साहेब दखल घेतात तेव्हा..!
साताऱ्यातील एका जाहीर सभेत बोलताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उदयनराजे स्वतःच एक मुक्त विद्यापीठ आहेत. यामध्ये कायदेपण तेच करतात आणि शिक्षापण तेच देतात, असे बोलताच समोर बसलेल्या गर्दीतून आपुलकीचा जनकल्लोळ उडाला व एक नेता एक आवाज, उदयनमहाराज उदयनमहाराज...! अशा घोषणांनी सभामंडप दणाणून निघाला आणि हो.. राज्याच्या बड्या नेत्यांनी आपल्या राजाची घेतलेली अनोखी दखल ही सातारकरांसाठी अभिमानास्पद असल्याची जाणीव झाली. यावरून फडणवीस आणि उदयनराजे यांच्या अतूट मैत्रीचा दृष्टांत होतो.
भूमाता दिंडी म्हणजे एक ऐतिहासिक लढा...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने होत असताना आपण पाहिलीत. मात्र, भूमाता दिंडीच्या माध्यमातून कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली उदयनराजेंनी जगाच्या पोशिंद्यासाठी रस्त्यावर उतरताना निडरपणे व आपल्या आक्रमक शैलीत शासनाला सळो की पळो करून सोडणारं ऐतिहासिक आंदोलन उभं केलं. त्याला उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घ्यायला भाग पाडलं. या आंदोलनामुळे सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन उदयनराजेंमध्ये असणारा लढवय्या व आक्रमक नेता सुप्त अवस्थेतून बाहेर पडून जेव्हा रस्त्यावर उतरला व तमाम बळीराजाने दिलेली साथ, देहभान विसरून प्रेरित झालेली अवघी तरुणाई, जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेसाठी उतरलेली सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातून मार्गक्रमण करत निघालेली मावळ्यांची फौजच आहे की काय, असा भास झाला.
या घटनेला अनेक वर्षे उलटून गेली असली तरी आजही या आठवणीने कृष्णा- कोयनेच्या
पाण्याला लावलेली आग नजरेसमोरून हटत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे आंदोलन खऱ्या अर्थाने गोरगरीब कष्टकरी जनतेचा दबलेला आवाज बुलंद करणारं ठरलं. यावेळी आंदोलनाची दिशा ठरवताना गावोगावी गाठीभेटी घेत असताना राजमहलात राहणारा राजा शेताच्या बांधावर बसून वृद्ध दांपत्यासोबत ठेचा भाकरी खाताना सोशल मिडियावरती व्हायरल झालेला फोटो आपण पाहिलाच असेल. यामुळे उदयनराजेंनी जातीपातीच्या, पक्ष संघटनेच्या पलीकडे जाऊन विशेषतः ज्येष्ठांचा आदर करत व रयतेची पिळवणूक करणाऱ्यांच्या विरुद्ध चवताळून उठणारा निडर व आक्रमक नेता, अशी ओळख निर्माण केली.
गोपीनाथ मुंडे कुटुंबीयांशी ऋणानुबंधाचा ठेवा...
उदयनराजेंच्या राजकीय जडणघडणीला परिसस्पर्श करून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती राजघराण्याची मोहर उमटवणारे महाराष्ट्रातील दिग्गज नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब यांचे व राजघराण्याचे ऋणानुबंध अविस्मरणीय असे आहेत. जेव्हा जेव्हा मुंडे साहेब पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असत. तेव्हा सर्वप्रथम जलमंदिर पॅलेस येथे येऊन आई भवानीमातेचे दर्शन व राजमाता माँसाहेब यांचे आशीर्वाद घेऊनच पुढील मोहिमेवर निघत, हे सर्वश्रूत असताना उदयनराजे आणि मुंडे साहेब यांचा सलोखा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवा आयाम देणारा ठरला. मात्र, हे वैभव फार काळ पाहण्याचे तुमच्या आमच्या नशिबी नव्हते, असेच म्हणावे लागेल. कारण दुर्दैवाने मुंडे साहेबांचे झालेले अकाली निधन ही खूप वेदनादायी अशी घटना होती. मात्र, मुंडे साहेबांच्या पश्चात त्यांच्या दोन्ही कन्या आपला आधारवड कोसळला म्हणून आकांताने व्यक्त होताना मुंडे साहेबांच्या अंत्ययात्रेत आपण पाहात होतो. अशावेळी अनेक नेते मंडळी याप्रसंगी मुंडे कुटुंबाच्या सांत्वनासाठी उपस्थित होती. मात्र, त्या ठिकाणी उदयनराजे पोहोचताक्षणीच पंकजाताईंनी फोडलेला हंबरडा आणि उदयनराजेंनी त्यांच्या डोक्यावर ठेवलेला वडीलकीचा बंधूतुल्य हात उभ्या महाराष्ट्राने पाहिला. यावरून एका बाजूला निडर व आक्रमक असलेला नेता, अशी ख्याती असणारे राजे आतून किती भावनाविवश आहेत, हे पाहावयास मिळते. कारण त्यांच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून तमाम उपस्थित्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या दिसल्या.
उदयनराजे, समाजमन जाणणारा राजा...
विविध अनुत्तरित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी जलमंदिर पॅलेस हे हक्काचं दालन म्हणून उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. शासन, प्रशासनस्तरावरील किंवा व्यक्तिगत अडीअडचणी अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे हक्काचं ठिकाण म्हणून मोठ्या विश्वासाने सर्वसामान्य जनता उदयनराजेंच्या जनता दरबारात गर्दी करते. तेव्हा समोरची व्यक्ती कोणत्या पक्षाची, कोणत्या संघटनेची किंवा कोणत्या जातीपातीची न पाहता संबंधित अधिकारी असो वा पदाधिकारी असो त्यांना आपल्या विशेष शैलीत ठणकावून प्रश्नांचा निपटारा करणे हा दिनक्रमच. उभ्या महाराष्ट्रात असा दरबार किंवा असा नेता होणे नाही, की ज्या ठिकाणी आलेला माणूस
आपली इच्छापूर्ती झाल्याशिवाय रिकाम्या हाताने जात नाही. मग ती भौतिक सुविधा असो अन्याय अत्याचाराच्या विरोधात दाद मागणी असो, व्यक्तिगत मदत असो किंवा वैद्यकीय मदत असो. यावरून सर्वसामान्य जनतेमध्ये राजेंविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. यावरून एक प्रसंग आठवतो ‘डॉगबाईट’ झालेला एक बालक वैद्यकीय मदतीसाठी जलमंदिरी येतो. त्याची परिस्थिती पाहून या आजाराचे गांभीर्य माहीत असताना देखील तत्काळ स्वतःची गाडी या बालकांसाठी देऊन पुढील सर्व वैद्यकीय उपचार पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना देऊन येणाऱ्या सर्व खर्चाचा तपशील मला कळवावा, अशी सूचना काही क्षणातच राजेंच्या तोंडून बाहेर पडते आणि आसपास
उभे असलेल्या जनतेच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. कारण राजांच्यामध्ये असलेला माणुसकीचा निखळ झरा अश्रूंच्या रूपाने डोळ्यातून वाहत होता. असे एक नाही अनेक प्रसंगसांगता येतील.
साताऱ्याशी नाळ घट्ट असलेले राजे...
राजकीय, सामाजिक कामानिमित्त पुणे, मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी जाणे क्रमप्राप्त असले, तरी उदयनराजेंची साताऱ्याची ओढ ही न्यारीच. यामध्ये विशेषतः गणपती उत्सव, दहीहंडीसारखे उत्सव उदयनराजेंच्या दृष्टीने अफलातून असतातच. याचबरोबर शाही दसऱ्याची परंपरा देखील जपली आहे. कारण हे उत्सव सातारकरांसोबत साजरे करणे यात मजा औरच असते. एवढेच नव्हे तर सातारा या शब्दावर प्रेम करणारा साताराप्रेमी म्हणून उदयनराजे यांच्याकडे पाहिले असता एक उदाहरण, की जसे पूना हॉस्पिटल, मुंबई हॉस्पिटल अशी शहराची नावे असणारी हॉस्पिटल आहेत. याच धर्तीवर डॉ. सुरेश शिंदे यांनी उभारलेले सातारा हॉस्पिटल निर्माण होताच उदयनराजेंनी डॉ. सुरेश शिंदे यांना कडकडून मारलेली मिठी एक प्रकारची इच्छापूर्तीच होती. अनेक राजकीय नेते आपल्या मतदारसंघात प्रमुख कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेताना आपण पाहात असतो. मात्र, उदयनराजे हे रसायनच वेगळे. उदयनराजेंच्या भेटी म्हणजे शिवतीर्थावरील रिक्षा स्टॉपचा रिक्षावाला, की ज्याच्या रिक्षात बसून फेरफटका मारणे, अंधाऱ्यारात्री फुटपाथवर धरणीच अंथरूण आणि आभाळाचं पांघरूण घेतलेल्या उघड्या प्रपंचाकडे करुणेने पाहून तत्काळ ऊबदार पांघरूण उपलब्ध करून देत गोरगरिबांच्या व्यथा जाणून एक पाऊल माणुसकीचं, असा आदर्श घालून देऊन माणूसपण जपणारा देवमाणूस म्हणजे उदयनराजे!
उदयनराजे अन् राजकीय संघर्ष...
‘सत्तेसाठी सतराशे साठ, मात्र रयतेसाठी एकच सम्राट’ या उक्तीला न्याय देण्यासाठी राजघराण्याचा वसा व वारसा जपत खऱ्या अर्थाने सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचा मूलमंत्र ‘पुस्तकबंद’ होता. त्याला न्याय देण्याचे कृतिशील कार्य उदयनराजेंच्या हातून घडले. साताऱ्याच्या शाहूनगरीचे पहिले नगराध्यक्ष म्हणून श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह ऊर्फ दादा महाराज यांनी पद भूषविले. हा अपवाद वगळता पाठीशी कोणताही अनुभव नसताना उदयनराजेंची राजकीय घोडदौड सुरू झाली. मात्र, ऐन उमेदीच्या काळात उदयनराजेंचे पितृछत्र हरपले व माँसाहेबांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली. यातून मार्ग काढताना राजघराण्याची अस्मिता सांभाळत व आलेल्या संकटावर मात करत आईसाहेबांनी उदयनराजेंना घडविताना घेतलेले कष्ट व समाजाप्रती असलेली कृतज्ञता जोपासण्याचा दिलेला संस्कार, हा उदयनराजेंच्या जडणघडणीचा पाया ठरला. परदेशातून शिक्षण घेऊन परतल्यावर काही मोजक्या सवंगड्यांसह राजकारणाचे धडे गिरवत असताना समोर अनंत अडचणी होत्या, सत्ताकेंद्रित अशा सत्ताधाऱ्यांचा ताफा व त्यांच्याशी दोन हात करताना जलमंदिर पॅलेसच्या आंब्याच्या झाडाखाली राजकीय प्रवेशाची रणनिती ठरली ते झाड आजही एका ऐतिहासिक घटनेची साक्ष देत आहे. अगदी याच वेळी आधारवडाची सावली देणारी बुजुर्ग मंडळी मिळाली. दुर्दैवाने ही मंडळी काळाच्या पडद्याआड झाली; त्यांना हे वैभव बघण्याचे सुख लाभले नाही. यामध्ये दिवंगत संपत (अण्णा) घोरपडे, विनायकराव घोरपडे (दादा), विश्वासराव कदम (बापू), श्यामराव घोरपडे (बापू), जयसिंग (अण्णा) भोसले, सुनील (भाऊ) सावंत, भीमराव (दादा) घोरपडे, सोपान (काका) पाटील, ॲड. एन. आय. बागवान, प्रल्हाद गोरे (बापू), शाहीर विनायकराव धसके, भगतसिंग घोरपडे, वसंतराव देशमुख यांचा समावेश आहे. याबरोबरच आजमितीला देखील यशवंतराव ढाणे (बापू), धनाजी (तात्या) माने, पैलवान तानाजीराव शेडगेंसारखे शिलेदार उदयनराजेंवर वडीलकीचा हात ठेऊन कार्यरत आहेत. त्यावेळी उभारलेल्या उदयनराजेंच्या पार्टीची आयडेंटी विरोधक भाषणातून आवर्जून बोलत, ती म्हणजे ‘गावाने ओवाळून टाकलेली कार्टी’ अशा कार्ट्यांना घेऊनच उदयनराजेंनी पार्टी बांधली. यातूनच सातारा विकास आघाडीची स्थापना झाली. यानंतर मात्र उदयनराजेंनी राजकीय पटलावरती गनिमी काव्याने आपल्या हटके रणनीतीतून झुंजार नेतृत्व उभे केले. अर्थातच असं नेतृत्व उभ राहणार असेल तर त्याला कुटुंबीयांचीही तितकीच मोलाची साथ हवी आणि अशीच भरभक्कम साथ आदरणीय आईसाहेब आणि वहिनीसाहेबांच्या रुपाने महाराज साहेबांना मिळाली, त्याचे फलित म्हणून बघता बघता नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या सत्तेत सामील होऊन सत्ताधाऱ्यांना हादरा दिला. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे काही कार्यकर्त्यांमधील नेतृत्वगुण ओळखून ज्याच्या स्वप्नात ग्रामपंचायत सदस्य होणेही नव्हते, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पं. स. सदस्य, सभापती/ उपसभापती, जि. प. सदस्य/ सभापती/ उपाध्यक्ष, नगरसेवक/ नगराध्यक्ष, तसेच सहकारी संस्थांचे पदाधिकारी होण्याची संधी प्राप्त करून दिली. हे फक्त उदयनराजेच करू शकतात. कारण चांद्यापासून बांद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातील राजकारणाचा आर्थिक सुबत्तेसह असलेला निवडीचा निकष आणि उदयनराजेंचा सर्वसामान्य फॉर्म्युला हा सत्तेच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पूरक असलेची खात्री ‘याचि देही याचि डोळा’ सातारकर जनतेने अनुभवली आहे. एवढ्यावरच न थांबता विधानसभेची निवडणूक लढवत एका विक्रमी विजयाला गवसणी घालत महाराष् राज ट्र ्याचे महसूल राज्यमंत्रिपद भूषविले व कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि आईसाहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवित राजघराण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. सलग दोन वेळा खासदार झाल्यानंतर तिसऱ्या वेळी निवडून येऊन अवघ्या तीन महिन्यांत सबंध हिंदुस्थानातील राजकीय इतिहासात खळबळजनक असा निर्णय घेतला व खासदारकीचा राजीनामा दिला. हे कोण्या ऐऱ्यागैऱ्याचे काम नसून त्याला वाघाचे काळीज लागते, ते दाखवून दिले. कारण परिणामांची तमा न बाळगता धाडसी निर्णय घेण्याची क्षमता असलेला नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयनराजेंचे नाव आदराने घेतले जाते. अशा या रयतेच्या राजाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
- सुनिल काटकर, सातारा.