बेकायदेशीर सावकारीवर कारवाई करा
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर सावकारी सुरू असून शेतकरी, कामगार, लहान व्यापारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सातारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर सावकारी सुरू असून शेतकरी, कामगार, लहान व्यापारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
सावकारांकडून अवास्तव व्याज आकारले जात असून, वेळेवर पैसे न दिल्यास मानसिक, शारीरिक त्रास देऊन जुलमी वसुली केली जाते. यामुळे पीडित लोक हतबल झाले आहेत. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे फोफावणाऱ्या सावकारीबाबत प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेकडून उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
यावेळी निवेदनात म्हटले आहे की, सावकारांकडून शेतकरी व व्यापाऱ्यांना जुलमी व्याजदराने कर्ज दिले जाते. आणि वेळेवर पैसे न दिल्यास मानसिक शारीरिक छळ केला जातो. तसेच बेकायदेशीररित्या जमिनी व मालमत्ता सावकारांच्या नावावर करून घेतल्या जात आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
जिल्हा प्रशासनाने बेकायदेशीर सावकारी रोखण्यासाठी विशेष मोहिम राबवून पीडित शेतकरी, व्यापारी व कामगारांना न्याय द्यावा. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटनांना आळा घालावा. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने होते. तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, प्रशांत मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.